मुंबई : घाटकोपर इमारत दुर्घटनेतील आरोपी शिवसेनेचा पदाधिकारी सुनील शितपला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर विक्रोळी पार्कसाईट पोलिस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी या प्रकरणा सुनील शितपविरोधात भारतीय दंडविधान कलम 304 (2) (सदोष मनुष्यवधाचा गुन्हा), 336,338,283/17 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सुनील शितपला आज न्यायालयात हजर करणार आहेत.

साईदर्शन इमारतीच्या तळमजल्याशी छेडछाड करुन सुनील शितपने नर्सिंग होमचं नुतनीकरण केलं होतं. या नुतनीकरणामुळेच इमारत कोसळल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सुनील शितपची पत्नी स्वाती शितपने शिवसेनेकडून नगरसेवकपदाची निवडणूकही लढवली होती.

मृतांचा आकडा वाढताच


दरम्यान, इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत एकूण 11 जण जखमी झाले आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 24 जणांना जिवंत बाहेर काढलं.

मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांचं बचावकार्य सुरु आहे.

14 तासांनंतर राजेश दोषी सुखरुप बाहेर
या दुर्दैवी घटनेतील दिलासादायक बाब म्हणजे राजेश दोषी नावाच्या व्यक्तीला सुमारे 15 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर एनडीआरएफच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढलं. राजेश दोषी यांना जवळच्याच शांतीनिकेतन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

मुख्यमंत्री आणि मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपरमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. इमारत दुर्घटनेची चौकशी करुन 15 दिवसांत अहवाल सादर करा, असा आदेश मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी दिला आहे.