कल्याण : सांस्कृतिक नागरी अशी ओळख असलेल्या डोंबिवलीत एक आगळं-वेगळं उद्यान उभं राहिलं आहे. या उद्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे यात बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांची भिंत उभारण्यात आली आहे.

Continues below advertisement


डोंबिवलीच्या सुनीलनगर परिसरात हे उद्यान उभारण्यात आलं असून त्याला नावही कवियत्री बहिणाबाई चौधरी उद्यान असंच देण्यात आलं आहे. या उद्यानात पूर्वी फक्त खेळणी होती, मात्र उद्यानाचं नूतनीकरण करताना बहिणाबाई चौधरींच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


यातूनच बहिणाबाईंच्या कवितांची भलीमोठी भिंत उभी करण्यात आली आहे. स्थानिक आमदार सुभाष भोईर यांच्या पुढाकाराने हे उद्यान उभारण्यात आलं असून या भागातील नागरिकांना या उद्यानाचं प्रचंड कौतुक आहे. एकीकडे बहिणाबाईंच्या कविता वाचून मोठी झालेली पिढी उतारवयाकडे झुकत असताना नव्या पिढीला मात्र त्यांची ओळखही नाही.


त्यामुळे लहानग्यांना बहिणाबाई कळाव्यात, त्यांच्या भावपूर्ण कविता वाचता याव्यात, यासाठी या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. सोबतच अस्वच्छ शहर म्हणून लागलेला डाग पुसण्याचाही प्रयत्न यातून करण्यात आला आहे.