Ganeshotsav 2022 : कोरोनानंतर (Coronavirus) तब्बल दोन वर्षांनी संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. घराघरांत बाप्पाचं आगमन झालं असून दीड दिवसांच्या गणरायाला भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला आहे. गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिका (BMC) आणि पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक मोकळ्या जागांवर विसर्जन तलाव उभारण्यात आले आहेत. तसेच, समुद्र किनाऱ्यांवरही विसर्जनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अशातच गणपती विसर्जनासाठी जलजीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. याच जलजीवरक्षकांसाठी आता सिद्धिविनायक मंदिर न्यासनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. 


गणेश विसर्जनावेळी (Ganpati Visarjan 2022) मुंबईतील (Mumbai) नोंदणीकृत जलजीवरक्षकाचा दुर्दैवानं मृत्यू झाल्यास सिद्धिविनायक मंदिर न्यासकडून पाच लाखांची मदत दिली जाणार आहे. सिद्धिविनायक मंदिर (Shree Siddhi Vinayak Ganapati Temple) न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी एबीपी माझाशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. 


कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी राज्यात निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे यंदा भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. खरंतर विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावं अशीच प्रार्थना आहे. विसर्जनाच्या वेळी नोंदणीकृत जलजीवरक्षक, अनेक नोंदणीकृत  गणेश मंडळही पुढाकार घेत असतात. मुंबई क्षेत्रातील विसर्जन स्थळी विसर्जन करताना दुर्दैवानं नोंदणीकृत जलजीव रक्षकाचा मृत्यू झाल्यास सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या वतीनं पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं. 


सिद्धिविनायक मंदिर न्यास हे लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येते. मग ती वैद्यकीय मदत असेल किंवा आत्महत्याग्रस्त मुलांसाठी केजी टू पीजी शिक्षण असेल, दानपेटीतील पैसा हा कारणी लागला पाहिजे ही भावना यामागे असते आणि त्यातूनच यंदाच्या विसर्जनावेळी ही मदत जाहीर करण्यात आली असल्याचंही आदेश बांदेकर यांनी बोलताना सांगितलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Gauri Pujan 2022 : गौराई माझी लाडाची लाडाची गं... शनिवारी कोणत्या शुभ मुहूर्तावर कराल गौरी आवाहन? पंचागकर्ते मोहन दाते सांगतात...