मुंबई : गुरुवारी 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अनंत चतुर्दशीसाठी (Ananta Chaturdashi) मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात आहेत. गणेश विसर्जनाला (Ganesh Visarjan) कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय, मुंबईत होमगार्डस, विविध स्वयंसेवी संस्था, पोलीस मित्रांची मदतदेखील होणार आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनाला (Lalbaugcha Raja Visarjan) यंदाही मोठी गर्दी होणार असल्याचा अंदाज आहे. त्यासाठीदेखील मुंबई पोलिसांकडून लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष बंदोबस्त असणार आहे.
मुंबई असा असणार पोलीस बंदोबस्त
मुंबई पोलीस दलाकडून 8 अप्पर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपायुक्त, 45 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2866 पोलीस अधिकारी आणि 16,258 पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत.
त्यांच्या सोबत महत्वाच्या ठिकाणी 35 एसआरपीएफ पलटन, क्यूआरटी पथक, दंगल नियंत्रण पथक, होमगार्डस् देखील बंदोबस्तासाठी असणार आहेत.
मुंबईतील गिरगांव, दादर, जुहू, मार्वे, अक्सा या प्रमुख विसर्जन स्थळांसह 73 नैसर्गिक ठिकाणांव्यतिरिक्त 160 हून अधिक कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या प्रत्येक ठिकाणी कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
प्रत्येक विसर्जनाची ठिकाणे सीसीटीव्ही निगराणीखाली असून प्रमुख विसर्जनाच्या ठिकाणी ध्वनीक्षेपक यंत्रणेसह तात्पुरते नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे. तसेच वाहतूक पोलीस विभागाकडून वाहतूकीचे योग्य नियमन करणेकरीता चोख उपाययोजना करण्यात आली आहे.
त्याचबरोबर 29 सप्टेंबर रोजी "ईद-ए-मिलाद" सण साजरा करण्यात येणार असून त्या निमित्ताने मुंबई शहरात विविध ठिकाणी मिरवणुकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या वेळी कायदा व सुव्यवस्था राखणेकामी देखील चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आलेले आहे.
लालबाग-परळ परिसरातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई पोलिसांची व्यवस्था
मुंबईतील उत्सवाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरणगावात विसर्जनाच्या दिवशी मोठी गर्दी उसळते. ही बाब लक्षात घेता लालबाग-परळ भागात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे. केवळ लालबाग-परळ भागात 300 सीसीटीव्हींची सोय केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी सहा छेडछाडविरोधी पथक तैनात करण्यात आले आहेत. मोबाईल चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी 6 विशेष पथके असणार आहेत.
तर, दहशतवादी विरोधी पथकाची एक टीमदेखील तैनात असणार आहे. संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याच्या तपासणीसाठी 3 बॉम्बनाशक पथकेदेखील तैनात असणार आहेत.
त्याशिवाय, तीन दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलिसांची 5 पथके, तीन सीसीटीव्ही व्हॅन, 2500 पोलीस मित्र कार्यकर्ते, सहा वॉच टॉवरची व्यवस्था करण्यात आली आहे.