मुंबईतल्या नामांकित आणि प्रसिद्ध मंडळांपैकी एक चिंचपोकळीच्या चिंतामणी खातू कारखान्यातून आपल्या मंडपाच्या दिशेनं मार्गस्थ झाला आहे. मूर्तीकार विजय खातूंच्या निधनामुळं कारखान्याच्या दरवाजावर यंदा चिंतामणीच्या स्वागताला वाद्यांचा गजर झाला नाही. मात्र, भारतमाता सर्कलच्या पुढे मात्र चिंतामणीच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे.
चिंचपोकळीच्या चिंतामणीसोबतच खेतवाडीचा राजा, चंदनवाडीचा राजा, अँटॉफ हिलचा राजा ह्या श्रींच्या मूर्तीदेखील खातू कारखान्यातून रवाना झाल्या आहेत. याशिवाय मुंबईचा राजा, डोंगरीचा राजा, फोर्टचा राजा, मुंबईचा महाराजा आदी मंडळांच्या मूर्ती मंडपाच्या दिशेने प्रस्थान होणार आहे.
दरम्यान, बाप्पांच्या आगमनासाठी दादर-परळमधल्या वाहतूक मार्गांमध्ये आज बदल करण्यात आलेत. दादर-परळ भागातील विशिष्ट रस्ते हे वाहतुकीसाठी काही तास बंद करण्यात आले असून, तिथली वाहतूक ही पर्यायी मार्गांवरून वळवण्यात आली आहे.
याशिवाय, लालबाग-परळ परिसरातील गर्दी पाहता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी भोईवाडा आणि भायखळा वाहतूक विभागाचे 50 पोलीस कर्मचारी तैनात आहेत. तर, शंभरहून अधिक पोलीस मिरवणुकीतील गर्दी नियंत्रणात ठेवत आहेत