मुंबई : मंगळवारी घरोघरी बाप्पांचे आगमन झाले. आज राज्यभरात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. दीड दिवसांच्या घरगुती गणपतीचे आज विसर्जन (Ganesh Visarjan) होणार आहे. मुंबईत महापालिकेच्यावतीने (BMC) गणेश विसर्जनाची (Ganesh Immersion) तयारी करण्यात आली आहे. कृत्रिम तलाव आणि सार्वजनिक नैसर्गीक विसर्जन स्थळांवर दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला जात आहे. राज्यातही विविध ठिकाणी स्थानिक प्रशासनांकडून विसर्जनासाठी योग्य ती तयारी केली आहे. तर, दुसरीकडे गणेश भक्तांकडून बाप्पांना वाजत, गाजत निरोप देण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेने प्रत्येक प्रभागात कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. नागरिकांना या कृत्रिम तलावात बाप्पांचे विसर्जन करावे, असे आवाहनही मुंबई महापालिकेने केले आहे. मुंबई महापालिकेच्या मदतीला स्वयंवसेवी संस्थादेखील आहेत. त्याशिवाय, विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला आहे.
स्टिंग रे, जेलीफिश पासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यांच्या दरम्यान मुंबईच्या समुद्र किनारी स्टिंग रे, जेलीफिशच आढळून येतात. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी समुद्र किनारी येणाऱ्या गणेश भक्तांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
कृत्रिम तलावाकडे ओढा
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दिड दिवसांच्या 129 सार्वजनिक आणि 21,101 खाजगी गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. यंदा ही वसई विरार पालिकेने पर्यावरणाच्या दृष्टीने शहरात प्रत्येक विभागात 105 कृत्रिम तलाव तयार केले आहेत. नागरीक कृत्रिम तलावाला पसंती देत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना साश्रु नयनांनी निरोप देण्यात आला. पारंपरिक पद्धतीने, ढोल ताशांच्या गजरात हा निरोप देण्यात आला. तलाव, नदी, विहीर आदी ठिकाणी बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
गणेशोत्सवानिमित्ताने मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल
19 ते 29 सप्टेंबर 2023 या दरम्यान साजरा करण्यात येणार्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने संपूर्ण शहरात वाहतूक रहदारीत वाढ होत असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
गणेश विसर्जनाचा मुहूर्त काय?
गणेश विसर्जन (दीड दिवस) मुहूर्त - 20 सप्टेंबर - दुपारी 3.18 ते संध्याकाळी 6.18
7.49 रात्री - 12.15 मध्यरात्री, 21 सप्टेंबर
3.12 पहाटे - 4.40 पहाटे, 21 सप्टेंबर