नवी मुंबई : नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्यावरुन चार तरुणी वाहून गेल्या आहेत. यापैकी तीन मुलींचे मृतदेह सापडले असून अद्यापही एक तरुणी बेपत्ता आहे. सर्व तरुणी नेरुळच्या एसआयईएस कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत. अग्निशमन दलाकडून बेपत्ता तरुणींचा शोध घेण्यात येत आहे.  पांडवकडा भागात जाण्यास बंदी असूनही नियमांचे उल्लंघन करुन पर्यटक त्यांचा जीव धोक्यात घालत असल्याचे या घटनेनंतर समोर आले आहे.

खारघर आणि बेलापूरदरम्यान पांडवकडामध्ये पावसाळ्यात या ठिकाणी खाली पावसाचे पाणी पडत असल्याने नैसर्गिक धबधबा तयार झाला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड या ठिकाणच्या पर्यटकांची या ठिकाणी उपस्थिती असते. अनेकदा या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई आणि मुंबईतील महाविद्यालयातील तरुण-तरुणींचा एक ग्रुप पांडवकडा परिसरात फिरायला गेला होता. बंदी झुगारुन हे सगळेजण तिथे फिरायला गेले. त्यावेळीच ही घटना घडली.