मुंबई : मुंबईतल्या समुद्रापासून अवघ्या 2 नॉटीकल माईल अंतरावर असलेल्या जहाजातून घाना देशाच्या चार नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे चारही खलाशी या जहाजात गेली साडेपाच वर्ष अडकून पडले होते.


 
2011 साली मॅग्नम व्ही नावाचं जहाज तांत्रिक बिघाडामुळे मुंबईतल्या बॅलार्ड पिअर परिसरात अडकलं होतं. यावेळी जहाजात असलेल्या चारही नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नव्हती. त्यातच बिघाडामुळे जहाजातला वीजपुरवठा बंद झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ आणखी वाढ झाली. मुंबईतल्या समुद्रापासून अवघ्या 2 नॉटीकल माईल म्हणजे साधारण 3.7 किमी अंतरावर हे जहाज एकाच ठिकाणी बंद पडलं होतं.

 
अशा खडतर परिस्थितीतही त्यांनी जहाज सोडलं नाही. ज्या कंपनीचं हे जहाज होतं त्यांच्याकडून साडेपाच वर्षात कोणतीही मदत मिळाली नसतानाही आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी हे चौघे जण अत्यंत कमी अन्नसाठ्यावर एकाच जहाजात 66 महिने अडकून होते.

 

अखेर आपल्या सुटकेसाठी त्यांनी एका संस्थेची मदत घेऊन मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यानंतर या घानाच्या नागरिकांची सुटका करुन त्यांना रात्री विमानाने मायदेशी पाठवण्यात आलं.

 

गेले 66 महिने मुंबईच्या किनाऱ्यावर एक जहाज अडकून राहतं आणि याची सुरक्षायंत्रणांना काहीही माहिती लागत नाही, हा प्रकार खरंच धक्कादायक मानायला लागेल.