कल्याण : प्रवासी असल्याचं सांगत रिक्षाचालकाला तीन साथिदारांच्या मदतीने लुटणाऱ्या पती पत्नीला कोळसेवाडी पोलिसांनी गजाआड केलं आहे. हे दोन्ही पती-पत्नी अंबरनाथ येथून रिक्षात बसले, त्यानंतर रिक्षाचालकाला बोलण्यात गुंतवून कल्याणमध्ये आणले याच दरम्यान त्यांचे आणखी तीन साथीदार रिक्षात बसले. केडीएमसीच्या 'ड' प्रभाग कार्यालयाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत रिक्षा थांबवायला सांगत या पाचही जणांनी रिक्षा चालकास बेदम मारहाण करीत त्याच्याकडील मोबाईल, रोकड आणि रिक्षा घेऊन सर्वजण पसार झाले. या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी अवघ्या सहा तासाच्या आतच सीसीटीव्हीच्या फुटेजच्या मदतीने चार आरोपींना अटक केले असून एका आरोपीचा शोध पोलीस करत आहेत.


नेमकी घटना काय?


अंबरनाथमध्ये पश्चिमेत राहणारा जावेद शेख हा रिक्षा चालवितो. 29 तारखेच्या रात्री एक पती-पत्नी त्याच्याकडे आले आणि आम्हाला एका ठिकाणी जायचे आहे असं सांगत त्याच्या रिक्षात बसले. रिक्षा उल्हासनगरात पोहचताच या दोघांचे अन्य तीन साथीदार आले. तेही रिक्षात बसले. रिक्षा थेट कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली परिसरात असलेल्या केडीएमसीच्या ड प्रभाग परिसरात पोहचली. याठिकाणी या पाचही जणांनी रिक्षा चालकाला थांबवून त्याला बेदम मारहाण करत लुटले. त्यानंतर शेख याने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.


पोलिसांनी सहा तासांत आरोपींना केले गजाआड


कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख, पोलिस अधिकारी हरीदास बोचरे यांच्या तपास पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. त्यानंतर त्यारात्री रिक्षा गेलेल्या रस्त्यातील सीसीटीव्हीच्या मदचीने पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. सहा तासांच्या आत उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या चार जणांना पा्ेलिसांना ताब्यात घेतले. यामध्ये करण दखनी हा सराईत गुन्हेगार आहे. करण दखनी विरोधात एकट्या उल्हासनगर सेंट्रल पोलीस ठाण्यात 14 गुन्हे दाखल असून अंबरनाथमध्ये देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याची पत्नी चैताली पाटील, मित्र कुणाल जाधव आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौघांपैकी तिघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता कल्याण न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. एका अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात केली जाणार आहे. तर एका फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha