Anil Deshmukh and Sachin Waze : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या लाचखोरीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची नियुक्ती केली आहे. आज चांदिवाल आयोगासमोर आज निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या वकिलाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उलटतपासणी केली. यावेळी वाझे यांचे वकील अॅड. नायडू याने अनिल देशमुख यांना अनेक प्रश्न विचारले. यातील एका प्रश्नाला उत्तर देताना आपण सचिन वाझेला ओळखत नसल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले.
चांदिवाल आयोगासमोर झालेले काही प्रश्नोत्तरे:
वाझेचे वकील अॅड. नायडू: तुम्ही अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले होते का, या बाबत ट्वीट केले होते का?
अनिल देशमुख: मी या प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तपास झाला असून आता पुन्हा चौकशी करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. मला अनेक लोक भेटली होती. त्यांनी या प्रकरणाचा तपास व्यवस्थित झाला नाही आणि सरकारने कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. त्यानंतर मी या प्रकरणाचा तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवला.
अॅड. नायडू: या प्रकरणाचा तपास झाला आहे हे कोणत्या अधिकाऱ्यांनी सांगितले, त्यांचे नाव सांगू शकाल का?
अनिल देशमुख: मला आठवत नाही
अॅड. नायडू: : याबाबत झालेली चर्चा, तुम्ही सांगत असलेल्या गोष्टींची काही नोंद आहे का?
अनिल देशमुख: मला आठवत नाही
अॅड. नायडू: सप्टेंबर 2020 च्या पहिल्या आठवड्यात सह-पोलीस आयुक्त (गुन्हे) म्हणून मिलिंद भारंबे यांची नियुक्ती करण्यात आली होती?
अनिल देशमुख: मला तारीख लक्षात नाही
अॅड. नायडू: सचिन वाझेच्या नियुक्तीनंतर भारंबे यांची नियुक्ती झाली होती का
अनिल देशमुख: मला आठवत नाही
अॅड. नायडू: CIU चा प्रभारी सह पोलीस आयुक्तांना अहवाल देत होता का
अनिल देशमुख: नियमांनुसार त्यांने तसे करायला हवं
अॅड. नायडू: वाझे प्रोटोकॉल फॉलो करत नाहीत, त्यांच्या वरिष्ठांना अहवाल देत नाहीत, याबाबत कधी (30 मार्च 2021 च्या आधी) मिलिंद भारंबे यांनी तक्रार केली होती का?
अनिल देशमुख: माझ्याकडे कोणत्याही प्रकारची तक्रार 30 मार्च 2021 पूर्वी आली नव्हती.
अॅड. नायडू: तुम्हाला आठवतंय का, तुम्ही ट्वीट आणि स्वत: चा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. ज्यामध्ये मुंबई पोलिसांनी केलेल्या कामाचे कौतुक होते. यामध्ये दिलीप छाब्रिया, फेक कॉल सेंटर प्रकरण, TRP प्रकरण, फेक फॉलोअर्स प्रकरण आदींचा उल्लेख होता.
चांदिवाल आयोगाने हा प्रश्न फेटाळून लावला.
अॅड. नायडू: तुम्हाला आठवतंय का, मार्च 2020 मध्ये मुंबई पोलिसांनी मास्कचा काळाबाजार उघडकीस आणला होता?
अनिल देशमुख यांच्या वकिलाने या प्रश्नावर आक्षेप घेतला. या कारवाईच्या वेळी सचिन वाझे पोलीस दलात नियुक्त नव्हता असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
अॅड. नायडू: अन्वय नाइक आत्महत्या प्रकरण, मास्क काळाबाजार प्रकरणातील कारवाईबाबत मदत आणि तांत्रिक मदतीसाठी तुम्ही वाझे यांना निर्देश दिले होते का,
अनिल देशमुख: मी सचिन वाझेला ओळखत नाही.
अॅड. नायडू: कुंदन शिंदेच्या आधी वैभव तुमाने तुमचा पर्सनल असिस्टंट होता का
अनिल देशमुख: नाही
अॅड. नायडू: वैभव तुमाने हा वाझे आणि तुमच्या अन्वय नाइक प्रकरणात समन्वय करत होता हे आठवतंय का
अनिल देशमुख: मला आठवत नाही
अॅड. नायडू: मार्च 2021 मध्ये परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्राप्रकरणी देशमुख यांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र योग्य आहे का?
अनिल देशमुख: हो. योग्य आहे.
अॅड. नायडू: तुम्ही काही गोष्टींवर उत्तर दिले आहे की, ते चुकीचे आहेत, दिशाभूल करणारे आहेत.
अनिल देशमुख: नाही. मी जे म्हटले ते योग्य आहे
अॅड. नायडू: जेव्हा फेक फॉलोअर्स, TRP प्रकरण, अन्वय नाईक प्रकरण सुरू होते, त्यावेळी वैभव तुमाने तुमच्यासोबत काम करत होता का, तुमच्या जागी तो समन्वय करत होता का?
अनिल देशमुख: तो सोबत काम करत होता हे योग्य आहे.