BMC : मुंबई महापालिकेचे आयुक्त (BMC Commissioner) इक्बाल चहल (Iqbal Singh Chahal) यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aaghadi) माजी नगरसेवक आक्रमक झाले आहेत. मुंबई महापालिकेवर आयुक्त इक्बाल चहल हे मार्च 2022 पासून प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Faction), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित तक्रार दाखल केली आहे.
मुंबई महापालिकेमध्ये सध्या प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळत असलेले आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या कार्यकाळात सुरू असलेल्या कामांमुळे आणि निर्णयांमुळे मुंबई महापालिकेचा दर्जा खालावत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये एकजूट दिसून येत आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांच्यासह 94 नगरसेवकांनी पत्र लिहिले आहे.
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ 8 मार्च 2022 मध्ये पूर्ण झाला. त्यामुळे मागील जवळपास नऊ महिन्यांपासून प्रशासक म्हणून आयुक्त कारभार पाहत आहेत. त्यामुळे याच मागील नऊ महिन्यात घेतले जाणारे निर्णय आणि कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात या नगरसेवकांनी तक्रारी केल्या आहेत.
काय आहेत महत्वाच्या तक्रारी ?
> मुंबई महापालिकेमध्ये पारदर्शकता व उत्तरादायित्व यांचा अभाव दिसून येत आहे.
> मुंबई महापालिका प्रशासनाकडून हजारो कोटी रुपयांची कंत्राटे आणि प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. मात्र, त्याच्या संदर्भात कुठलाही सार्वजनिक मसुदापत्र सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.
> कामकाजाची पडताळणी किंवा नियंत्रण यावरील उपाय योजनांचा सुद्धा अभाव निर्माण झाला आहे.
> मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या निकषांचे पूर्णपणे उल्लंघन केले जात आहे. या बदल्या मनमानी पद्धतीने केल्या जात आहेत. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पंधरवड्याला बदल्या केल्याचे आरोप माजी नगरसेवकांनी केला आहे.
> मुंबई महापालिकेमध्ये 'कॅश फॉर ट्रान्सफर' स्वरूपाचा मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामध्ये आळीपाळीने सर्वाधिक बोली लावणाऱ्यांना पदे दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
> मुंबई महापालिकेच्या कारभारात आर्थिक गैरव्यवस्थापन त्यासोबतच वित्तीय बेशिस्तपणा दिसत आहे
> सध्याच्या कारभारामुळे अधिकाऱ्यांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होत असून महापालिकेचा कारभार घसरला असून दर्जा खालावत आहे.
आयुक्त इक्बाल चहल यांनी आरोप फेटाळले
माजी नगरसेवकांनी केलेल्या आरोपांवर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या कारभारात 100 टक्के पारदर्शकता असल्याचे म्हटले आहे. प्रशासनाने घेतलेल्या सर्व निर्णयांची, दिलेल्या कामांची, आणि सर्व ठरावाची माहिती महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती सुद्धा चांगली आहे. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा किंवा आर्थिक स्थिती कोलमडल्याचा कुठल्याही प्रकारचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे चहल यांनी स्पष्ट करत आरोप फेटाळून लावले. मुंबई महापालिकेच्या गंगाजळीमध्ये मागील 2 वर्षात दहा हजार कोटींची वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.