मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या मुलाला पालिकेचे कंत्राट मिळवून दिले आहे. तसेच एसआरएची घरे लाटली आहेत. याची तक्रार करूनही पालिका आयुक्त आणि ठाकरे सरकार कोणतीही कारवाई करत नसल्याने महापौरांची चौकशी करून पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी आज पालिका मुख्यलयासमोर आंदोलन केले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या नावे 'किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी वरळीच्या गोमती जनता सोसायटी, जी के कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई या पत्त्यावर रजिस्टर आहे. याच पत्त्यावर 8 बोगस कंपन्या रजिस्टर झालेल्या आहेत. त्या सगळ्याच कंपन्यांचे मालकी हक्क, आर्थिक हितसंबंध, व्यवहारातील पारदर्शकता आणि त्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरएचे चार गाळे बळकावले असून त्याचीही चौकशी करावी अशीही मागणी केल्याची माहिती सोमय्या यांनी दिली. महापौर या पदावर असलेल्या व्यक्तीने आपल्या कुटुंबियांना पदाचा गैरवापर करत लाभ करून दिल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
मात्र आयुक्तांनी आणि ठाकरे सरकारने महापौरांविरोधात कारवाई केली नाही, असे सोमय्या म्हणाले. महापौरांची चौकशी करून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी करत एसआरएकडेही महापौरांची तक्रार करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. दरम्यान याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता सोमय्या यांच्या आरोपाची पुराव्यासह मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन उत्तर देऊ असे सांगितले.