मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहनतळांलगतच्या अनधिकृत पार्किंगवर उद्यापासून धडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत. या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या 23 सार्वजनिक वाहनतळांलगतच्या 500 मीटर परिसरात आढळून येणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर उद्यापासून दंडात्मक कारवाई सुरु करण्यात येत आहे.
या अंतर्गत संबंधित परिसरात एखादे अवजड वाहन अनधिकृतपणे उभे असल्याचे आढळल्यास त्यावर किमान 15 हजार रुपये दंड आकारणी करण्यात येणार आहे. मध्यम आकाराच्या वाहनांवर रुपये 11 हजार तर कार-जीप यासारखी वाहने अनधिकृतपणे 'पार्किंग' केले असल्याचे आढळून आल्यास त्यावर रुपये 10 हजार एवढा दंड आकारला जाणार आहे.
रिक्षा, साईडकार असलेले दुचाकी वाहन आणि तीन चाकी वाहनांवर 8 हजार रुपये दंड तर अनधिकृतपणे पार्क केलेल्या दुचाकी वाहनांवर किमान रुपये 5 हजार दंड आकारण्यात येणार आहे.
सध्या मुंबईत 23 ठिकाणी सार्वजनिक वाहनतळ सुरु असून यापैकी 7 ठिकाणचे वाहनतळ हे कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत मोफत असणार आहेत. महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर व रस्त्यांलगत अतिक्रमीत स्वरुपात अनधिकृत पार्किंग होत असल्याचं निदर्शनास आले असून त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
नागरिकांना आपली वाहने पार्क करणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेद्वारे विविध 146 ठिकाणी तब्बल 34 हजार 808 वाहने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, अनेक ठिकाणी वाहनतळांचा वापर न करता लगतच्या रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग केले जात आहे. हे लक्षात घेऊन वाहनांच्या पार्किंगला शिस्त यावी आणि वाहतूक सुरळीत राहावी, याकरिता पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या 23 ठिकाणी असणाऱ्या महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांलगतच्या 500 मीटर परिसरातील रस्ते किंवा फूटपाथवर अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवरील कारवाईला उद्यापासून सुरुवात होत आहे.
पहिल्या टप्प्यात 23 ठिकाणी असणाऱ्या महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांच्या लगतच्या परिसरात कारवाई करण्यात येणार आहे. तसेच आणखी 3 ठिकाणी सार्वजनिक वाहनतळ लवकरच सुरु होणार आहेत. त्यामुळे सध्या 23 ठिकाणी असलेल्या सार्वजनिक वाहनतळांची संख्या 26 होणार आहे. तसेच या कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यात महापालिका क्षेत्रातील काही रस्ते नो पार्किंग झोन म्हणून निर्धारित करण्यात येणार असून सदर रस्त्यांवर आढळून येणाऱ्या अतिक्रमित स्वरुपाच्या अनधिकृत पार्किंगवर देखील महापालिकेद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.
अनधिकृत ठिकाणी पार्क केलेली वाहने टोचन केल्यानंतर संबंधित मालकाने 30 दिवसांच्या आत सोडवून न नेल्यास ती वाहने बेवारस असल्याचे समजून त्यांची लिलावामध्ये विक्री करण्यात येईल.