मुंबई : राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर 2020 या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी 57.56 कोटी रुपये वितरीत करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने आज शासन निर्णय जारी केला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्वाच्या आहेत. ग्रामीण आरोग्यच्या ते कणा आहेत. त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय दिनांक 25 जून 2020 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला, असं राजेश टोपे म्हणाले.
त्यानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना 1 जुलै 2020 पासून प्रत्येकी 2000 व 3000 रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते मार्च 2020 या कालावधीतील वाढीव मोबदला अदा करण्यास पावसाळी अधिवेशनात विधीमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यास अनुसरुन वित्त व नियोजन विभागाने जुलै ते ऑक्टोबर या कालावधीचे 57.56 कोटीच्या अनुदान वितरणास मान्यता दिली आहे. दिवाळी सणापूर्वी राज्यातील सुमारे 70 हजार आशा भगिनींना वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांचे एक रक्कमी लाभ दिवाळीच्या आत
राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचान्यांना एलआयसी. योजनतंर्गत निवृत्तीनंतर देण्यात येणारे एक रक्कमी लाभ दिवाळीच्या आत देण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती, राजीनामा,मृत्यू,सेवेतून काढून टाकल्यानंतर अथवा मुख्यसेविका, पर्यवेक्षिका या पदावर निवड होईपर्यंत एलआयसी. योजनेतंर्गत एक रक्कमी लाभ देण्याबाबतची योजना राज्यात सुरु आहे. या योजनेअंतर्गत सन 2020-21 या वर्षांत 900 प्रकरणे आली होती यापैकी 875 प्रकरणांमध्ये लाभ देण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणे त्रुटी असणारे आणि मागील प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करून या सेविकांची दिवाळी गोड करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
एलआयसी मार्फत अंगणवाडी सेविकांना वयाची 65 वर्ष पूर्ण सेवानिवृत्त झाल्यानंतर एक लाख रुपये एकरकमी लाभ देण्यात येणार आहे. तसेच राजीनामा, सेवेतून काढून टाकण्यात आलेले व सेवेत कार्यरत असतांना मृत्यू पावल्यालेल्या सेविकांच्या वारसदारांस ही एव्हढीच रक्कम देण्यात येणार आहे. मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 75 हजार रक्कम देण्यात येणार असल्याचे यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.