मुंबई : मुंबईचा ऐतिहासिक वारसा असलेल्या दक्षिण मुंबईतल्या फ्लोरा फाऊंटनचा नयनरम्य देखावा मुंबईकरांना पुन्हा अनुभवता येणार आहे. मुंबई ऐतिहासिक वारसा जतन समितने हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता तब्बल वर्षभरानंतर फ्लोरा फाउंटनच्या दुरुस्तीचं आणि सुशोभिकरणाचं काम हातात घेतलं जातं आहे.
येत्या सहा महिन्यातच फ्लोरा फाउंटनची शोभा पुन्हा अनुभवता येईल, असं महापालिका प्रशासनानं सांगितलं आहे. मात्र, आतापर्यंतच्या दिरंगाईनं या प्रकल्पाच्या खर्चात जवळपास तीन कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळे फ्लोरा फाऊंटनचे कारंजे विलोभनीय असले तरी चांगलेच महागात पडणार आहेत.

 

फ्लोरा फाऊंटनला आता पुनरुज्जीवन मिळतं आहे. गेली ३-४ वर्षे मुंबईची ओळख दर्शवणारा फ्लोरा फाऊंटनचा ऐतिहासीक वारसा बंद पडून होता. आता मात्र लवकरच म्हणजे येत्या सहा महिन्यातच फ्लोरा फाउंटनचं नयनरम्य दृष्य मुंबईकरांना पुन्हा डोळ्यात साठवता येणार आहे.

 

पहिल्या सहा महिन्यांच्या टप्प्यात फ्लोरा फाउंटनच्या पुतळ्याची झालेली झीज, कारंजामुळे आसपास होणारी पाणी गळती असं दुरुस्तीचं काम केलं जाईल. दुसऱ्या टप्प्यात फ्लोरा फाउंटन आणि आसपासच्या परिसराचं सुशोभिकरण केलं जाईल.

 

विशेष म्हणजे दक्षिण मुंबई सारख्या वर्दळीच्या ठिकाणी फ्लोरा फाउंटनजवळ मुंबईकरांना निवांत वेळ घालवण्यासाठी एक छोटं पब्लिक पार्कही तयार होईल. या संपूर्ण प्रकल्पाचं काम इन्टँक्ट ऑर्गनायझेशन करते आहे.

 

फ्लोरा फाउंटनच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला गेला त्यावेळचा प्रस्तावित खर्च होता 1.25 कोटी आणि आता वाढून तो ४.३४ कोटींवर पोहोचला.

 

मुंबईकरांसाठी हुतात्मा चौक हा परिसरच मुळी अभिमानाचा आहे. त्याच ठिकाणी असलेल्या फ्लोरा फाउंटनसारख्या ऐतिहासीक वारशाकडे मात्र आतापर्यंतच्या दिरंगाईनं बरंच दुर्लक्ष झालं आहे.