अंबरनाथ  : केवळ तोकडे कपडे घातल्याचं कारण काढत मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरूण आणि दोन तरुणींना त्या ठिकाणी असलेल्या 6 ते 8 टवाळखोर मुलांनी बेदम मारहाण केली होता. हे तरुण इथेच थांबले नाही, तर त्यांनी  दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला होता. या विनयभंग आणि मारहाण प्रकरणात पोलिसांनी  5 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. 


या प्रकरणात रात्री उशिरा पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यातील तीन आरोपी हे  अल्पवयीन आहेत. हे पाचही आरोपी असून मलंगगड परिसरात राहणारे आहेत.  तीनही अल्पवयीन मुलांना भिवंडीत बालसुधारगृहात पाठवणार आहेत. तर उर्वरित दोन आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. 


तोकड्या कपड्यांमुळं मित्रांसह फिरण्यासाठी गेलेल्या तरुणींचा विनयभंग; मलंगगड परिसरातील निंदनीय घटना


या आरोपींनी रविवारी मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. ही निंदनीय घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी स्वतः ची सुटका करून घेत नेवाळी पोलीस चौकी गाठली. मात्र पोलिसाकडून त्यांना मेडिकल करून या तसेच इथे तक्रार होणार नाही, हिललाईनला जा असे सांगत माघारी धाडले. मात्र यातील पीडित तरुणीने हिम्मत न हारता सोशल मिडीयावरून या घटनेला वाचा फोडताच जागे झालेल्या पोलिसांनी याप्रकरणी मंगळवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा नोंदवला होता.


डोंबिवली पलावा परिसरात राहणारे दोन तरुण आणि दोन तरुणी असे चौघेजण रविवारी सुट्टी असल्यानं सायंकाळच्या सुमारास मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले होते. अचानक पाऊस आल्याने त्यांनी एका शेडचा आसरा घेतला. याच वेळी तरुणींनी घातलेला तोकड्या कपड्यांमुळे काही टवाळखोर 6 ते 8  तरुणांच्या जमावाने तरुणींची छेड काढण्यास सुरुवात केली. काही क्षणातच या तरुणांनी तरुणींच्या दोन्ही मित्रांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसंच या तरुणींचे कपडे फाडण्याचा देखील प्रयत्न केला. बराच वेळ हे तरुण या मुलींशी लगट करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या मित्रांना काठ्यांनी मारत होते. या चौघांनी कशीबशी या तरुणांच्या तावडीतून सुटका करत तेथून  दुचाकीवरून पळ काढला. 


चौघांनी तिथून थेट नेवाली पोलीस चौकी गाठली. त्या ठिकाणी घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील पोलिसांनी मेडिकल करून या, इथे तुमची तक्रार घेणार नाही. तुम्ही हिललाईन पोलीस स्टेशनला जा असा सल्ला दिल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. मानसिक ताण आणि शारीरिक वेदनेनं पीडित तरुणांनी अखेर सोशल मिडीयाचा आधार घेत इंस्टाग्रामवरून आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. त्यानंतर अनेकांनी त्यांची ही पोस्ट मुंबई पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्त आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग करत न्यायाची मागणी केली. यानंतर जागं झालेल्या पोलिसांनी याप्रकरणी हिललाईन पोलिसांत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.