मुंबई : मुंबईवरुन दिल्ली प्रवास करताना राजधानी एक्सप्रेस प्रवाशांची पहिली पसंती असते. आता मुंबईकरांसोबतच नाशिक, धुळे आणि जळगावकरांना या राजधानी एक्सप्रेसचा लाभ घेता येणार आहे. 19 जानेवारीला उद्घाटन होऊन मध्य रेल्वेची ही सेवा सुरू होणार आहे. यामुळे मुंबईकरांसोबतच नाशिक-धुळे-जळगावकरांना राजधानीनं दिल्ली गाठता येणार आहे. या ट्रेनबाबत सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी करण्याचे देखील आदेश मध्य रेल्वेला मिळाले आहेत.

मध्य रेल्वेने या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मध्य रेल्वेवर धावणारी ही पहिलीच राजधानी एक्सप्रेस आहे. या आधी 2 राजधानी एक्सप्रेस ट्रेन पश्चिम रेल्वेवर धावत आहेत. 26 वर्षांनंतर मुंबईला तिसरी आणि मध्य रेल्वेला आजपर्यंतची पहिली राजधानी मिळाली आहे.

यासोबत अनेक सुविधांचे उद्घाटन आणि लोकार्पण या दिवशी होण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेली पेन स्टेशनपर्यंतची मेमु सेवा थेट रोह्यापर्यंत चालवली जाणार आहे. तर पुणे-कर्जत-पुणे पेसेंजर ट्रेन पनवेलपर्यंत वाढवण्यात येणार आहे.



आता राजधानी एक्सप्रेस सीएसएमटी टर्मिनसमधून नाशिकमार्गे हजरत निझामुद्दीन (दिल्ली) ला पोहचणार आहे. कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी जंक्शन, आग्रा या स्थानकांवर एक्सप्रेसला थांबा घेण्यात येणार आहे. राजधानी एक्सप्रेस सीएसएमटी स्थानकातून दर बुधवारी आणि शनिवारी सुटणार आहे.

बुधवारी आणि शनिवारी गाडी क्र. 22221 सीएसएमटी ते निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस सकाळी 2.20 वाजता सुटणार आहे. तसंच, गुरुवारी आणि रविवारी गाडी क्र. 22222 निझामुद्दीन ते सीएसएमटी राजधानी एक्स्प्रेस दुपारी 3.45 वाजता सुटणार आहे.  या एक्स्प्रेसला 15 बोगी असणार आहेत.