नवी मुंबई : बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांनी केलेल्या अपहरण प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलीप खेडकरच्या ड्रायव्हरला (Dilip Khedkar) अटक केली आहे. रबाले पोलिसांनी आरोपी ड्रायव्हर प्रफुल्ल साळुंखे याला धुळे येथून अटक केली आहे. गेल्या सहा दिवसापासून दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल साळुंखे फरार होते. दिलीप खेडकरला शोधण्यासाठी नवी मुंबई पोलीसांची तीन टीम रवाना झाल्या आहेत.

Continues below advertisement

 सहाय्य पोलीस आयुक्त राहूल धस यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप खेडकर फरार प्रकरणातील चालक प्रफुल्ल साळुंखे याला सिंदखेड, धुळे येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीला २४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे. दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर आणि एक अज्ञान आरोपीचा शोध सुरू आहे. तीन पथके शोध घेत आहेत.  किडनॅप करून ज्या गाडीतून घेवून गेले होते. ती गाडी ताब्यात घेण्यात आलेली नाही.

नेमकं प्रकरण काय?

शनिवारी सायंकाळी सुमारे सव्वा सातच्या सुमारास मुलुंड-ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 क्रमांकाच्या लँड क्रूझर गाडीचा अपघात झाला. अपघातानंतर गाडीतून उतरलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने गाडीत बसवून नेले, असा आरोप करण्यात आला. यानंतर ट्रक चालकाने ही घटना तात्काळ मालक विलास ढेंगरे यांना कळवली आणि रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी संबंधित लँड क्रूझरचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान, MH 12 RP 5000 क्रमांकाची गाडी पुण्यातील बाणेर परिसरात एका बंगल्यासमोर उभी असल्याचे निदर्शनास आले. सदर बंगला बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या मालकीचा असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. या प्रकारांच्या चौकशीसाठी पोलीस खेडकर कुटुंबियांच्या बंगल्यावर गेले असता दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर फरार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांकडून दोघांचाही शोध घेतला जात आहे. 

Continues below advertisement

दिलीप आणि मनोरमा खेडकर हे त्यांचे फोन पुण्यातील बंगल्यात ठेऊन गायब झाले आहेत. रबाळे आणि पुण्यातील चतुश्रुंगी पोलिसांनी दोघांच्या मोबाईल लोकेशनचा शोध घेतला असता त्यांचं अखेरचं लोकेशन त्यांच्या बंगल्यातच आढळलं आहे. पोलिसांनी आतमध्ये जाऊन तपास केला असता दोघांच्या मोबाईलचे लोकेशन आढळणे बंद झाले. पोलिसांनी घरातून पूजा खेडकरचा एक जुना मोबाईल ताब्यात घेतलाय. मात्र, दिलीप आणि मनोरमा खेडकर यांचे मोबाईल मात्र सापडलेले नाहीत. दिलीप आणि मनोरमा खेडकर यांच्या रबाळे इथल्या अपघातातील 5000 क्रमांकाची लॅन्ड क्रुझर गाडी वगळता सर्व गाड्या बंगल्यातच आहेत. तर मनोरमा खेडकर या कॅबमधून पळाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. 

मनोरमा खेडकरने पोलिसांवर सोडले कुत्रे 

पोलीसांनी घरी येऊन दरवाजा उघडण्याची विनंती केली असता, दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. उलट, पोलीसांवर घरातील कुत्रे सोडले, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.  काही वेळानंतर प्रल्हाद कुमार याला पोलीसांच्या हवाली करण्यात आले. मात्र याच दरम्यान, दिलीप खेडकर दुसऱ्या रस्त्याने पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.