मुंबई : उपनगरीय रेल्वे प्रवासी प्रतीक्षा करत असलेली एसी लोकल अखेर मुंबईत दाखल झाली आहे. सध्या या लोकलचा मुक्काम कुर्ला कारशेडमध्ये आहे. या लोकलच्या चाचणीला 16 एप्रिलपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. घामाच्या धारांनी हैराण होणाऱ्या मुंबईकरांना गारेगार प्रवास अनुभवता येणार आहे.


 

…म्हणून 16 एप्रिलपासून एसी लोकलची सुरुवात!

भारतीय रेल्वेची सुरुवात 16 एप्रिल 1853 रोजी मध्य रेल्वेमधूनच झाली. हा ऐतिहासिक दिवस लक्षात घेता 16 एप्रिलचा मुहूर्त एसी लोकलच्या चाचणीसाठी निवडण्यात आला आहे.

 

पश्चिम रेल्वेआधी मध्य रेल्वेचा नंबर!

सुरुवातीला पश्चिम रेल्वेवर ही एसी लोकल धावणार होती. मात्र, रेल्वे मंत्रालयाने या लोकलला मध्य रेल्वेमार्गावर आणण्याचा निर्णय घेतला.त्यामुळं आता ही एसी लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार आहे. रेल्वेच्या चेन्नईतील इंटीग्रल कोच फँक्टरीमध्ये या लोकलची निर्मिती करण्यात आली आहे.

 

नव्या एसी लोकलची वैशिष्ट्ये:

  1. आधुनिक सुविधांची देशातली पहिली 12 डब्यांची एसी लोकल

  2. या लोकलमधील 6-6 डबे आतून एकमेकांना गँगवेमार्फत जोडलेले असणार

  3. डब्यांना ऑटोमॅटिक दरवाजे

  4. प्लॅटफॉर्मवर जेव्हा लोकल येईल, तेव्हा मोटरमनच्या हातात दरवाजे उघडणे, बंद करण्याचे नियंत्रण

  5. अडचणीच्या वेळी प्रवाशांना एका नॉबच्या सहाय्यानं दरवाजे उघडता येणार

  6. स्टीलपासून बनवलेले वातानुकुलित कोच स्टील ग्रे आणि इंडीगो रंगात

  7. प्रत्येक कोचमध्ये मोठ्या खिडक्या

  8. सुरक्षेच्या दृष्टीनं खिडक्यांच्या काचा आणि दरवाजांमध्ये विशेष रचना

  9. डब्यात सीट्स अत्यंत आरामदायी असतील

  10. दोन सीटच्या अंतरात वाढ, गर्दीत उभं राहून प्रवाशांना प्रवास शक्य

  11. नव्या पद्धतीचे हँडल आणि दरवाजातील खांब

  12. एका डब्यात सुमारे 400 प्रवासी

  13. 12 डब्यात 5 हजार प्रवासी प्रवास करु शकणार

  14. मोटरमनशी बोलण्यासाठी टॉक बॅक मशिनची सुविधा

  15. एसी लोकलच्या प्रत्येक डब्यात 15 टनांचे दोन एसी