पालघर : पालघर जिल्ह्यात गँगस्टर सुरेश पुजारीची टोळी पुन्हा सक्रीय झाल्याची चर्चा सुरु आहे. कारण नालासोपारा पश्चिमेकडील गॅलक्सी हॉटेलमध्ये खंडणीच्या कारणातून एकावर गोळीबार झाला. हल्लेखोर सुरेश पुजारीच्या नावाची चिठ्ठी टाकून लगेच फरार झाला.
एक व्यक्ती दुपारच्या सुमारास चेहऱ्यावर रुमाल बांधून गॅलक्सी हॉटेलमध्ये शिरला. त्याने काऊंटरवर बसलेल्या व्यक्तीवर गोळी झाडली. गोळी झाडल्यानंतर सुरेश पुजारी नावाची चिठ्ठी टाकून तो काही वेळातच फरार झाला.
गोळीबारात जखमी झालेल्या कर्मचाऱ्याची प्रकृती सध्या गंभीर आहे. मात्र शहरात अशा प्रकारच्या घटना सर्रासपणे होत असताना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यापूर्वीही सुरेश पुजारीने वसईतील एका आणि याच गॅलेक्सी हॉटेलच्या मालकाला खंडणीसाठी धमकी दिली होती. मात्र या प्रकरणात सुरेश पुजारीच्या हस्तकाला पकडण्यात ठाणे पोलिसांना यश आलं होतं.
खंडणीसाठी सुरेश पुजारीने हॉटेल व्यावसायिकांना धमकी अनेकदा धमकी दिल्याचं समोर आलं आहे. मात्र पहिल्यांदाच पुजारी टोळीने आपली दहशत माजवण्यासाठी थेट गोळीबार केला असावा, अशी चर्चा सध्या पालघर जिल्ह्यात सुरु आहे.