मुंबई : एक कोटी खर्चून घेतलेला फायर रोबो पूर्णत: नापास ठरला आहे. फायर रोबो फायर ब्रिगेडचा पाण्याचा पाईपही ओलांडू शकला नाही, अशी कबुली खुद्द मनपा प्रशासनाने स्थायी समितीत दिली आहे. वांद्रे पश्चिम येथे एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीत मुंबई अग्निशमन दलात नुकताच सामील झालेला फायर रोबो पूर्णत: नापास ठरला होता. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्राणांची बाजी लावून इमारतीतल्या लोकांना बाहेर काढले होते.
मात्र, कोट्यावधींचा खर्च करुन जे रोबो अग्निशमन दलाच्या ताफ्यात आणले जातायेत ते फेल ठरत आहेत. एमटीएनएल इमारतीच्या आग दुर्घटनेवेळी रोबोला पुढे जाण्यासाठी कर्मचाऱ्यांनाच धक्का मारावा लागला. इतकंच नाही तर हा रोबो सपाट जमिनीवरच चालू शकतो. तो इमारतीच्या शिड्यांवर चढू शकला नाही. या रोबोला पाण्याच्या पाईपचा अडथळाही पार करता आला नाही.
आग लागलेल्या ठिकाणी अडथळेच अडथळे असतात. जर सपाट जमिनीवरुनच आग विझवायची असेल तर ते काम आपले जवानही करु शकतात. फायर रोबो हा विशेषत: चिंचोळ्या गल्ल्या, अडचणीचे रस्ते, रसायनांचे साठे असलेल्या ठिकाणची आग विझवण्यासाठी घेतला गेला आहे. ज्या ठिकाणी जवान पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी हा रोबो आग विझवेल म्हणून रोबोला ताफ्यात स्थान देण्यात आलं. पण, हा रोबो पूर्णत: कुचकामी असल्याचं प्रशासनानं आज स्थायी समितीत दिलेल्या कबुलीवरुन स्पष्ट झालं आहे.
याबाबत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची आणि रोबो खरेदीच्या कंत्राटाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. तसंच, चिफ फायर ऑफिसर प्रभाकर रहांदळे यांना उपायुक्तपदी बढती देण्यासही रोखावं जावं अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
एक कोटींचा फायर रोबो पूर्णत: नापास, मुंबई मनपा प्रशासनाची स्थायी समितीत कबुली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2019 11:31 PM (IST)
एमटीएनएल इमारतीच्या आग दुर्घटनेवेळी रोबोला पुढे जाण्यासाठी कर्मचाऱ्यांनाच धक्का मारावा लागला. इतकंच नाही तर हा रोबो सपाट जमिनीवरच चालू शकतो. तो इमारतीच्या शिड्यांवर चढू शकला नाही. या रोबोला पाण्याच्या पाईपचा अडथळाही पार करता आला नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -