मुंबई: मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागात, एका मेडीकल दुकानाला लागलेल्या भीषण आगीमध्ये आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. सकाळी 6.18 वाजता अंधेरी पश्चिमेतील जुहू गल्ली येथील मेडीकल दुकानाला आग लागली होतीत. दरम्यान, या अग्निशमन दलानं तासाभरातच या आगीवर नियंत्रण मिळवलं.


 

आग विझविण्यासाठी ३ फायर इंजिन, २ टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले होते. मेडीकल दुकानाला लागलेली आग ही इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरही पसरली होती. आग फार मोठी नसल्याचं अग्निशमन दलाचं म्हणणं आहे. पण या आगीमुळे गुदमरुन आठ जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता अग्निशमन दलानं वर्तवली आहे.

 

अग्निशमन दलानं होरपळलेल्या नागरिकांना वाचविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. त्यांना तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला. तर 1 व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर सध्या उपाय सुरु आहेत. दरम्यान या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.