भिवंडी: भिवंडीतल्या गुंदवली ग्रामपंचायत हद्दीतील ऑईल गोडाऊनला रविवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत 12 ते 15 गोडाऊन जळून खाक झाली.


आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, ठाणे येथील अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, 6 तासांपासून आग अजूनही धुमसतीच आहे.

भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गोदामं आहेत. गुंदवली ग्रामपंचायत क्षेत्रातील श्री गणेश कंपाऊंड या गोदाम संकुलात इजिलिटी वेअरहाऊस आहे. त्यामध्ये गाड्यांचे ऑइल, बीएमडब्ल्यू गाड्यांचे टायर आणि इतर साहित्य हे जवळपास एक लाख स्क्वेअर फुटाच्या 12 गोदामांत साठविले होते.

त्याठिकाणी रात्री बाराच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची माहिती कळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, परंतु आग मोठी असल्याने कल्याण, उल्हासनगर, ठाणे येथील अग्निशामक दलाची मदत मागवण्यात आली.

गोदामात साठविलेले ऑइलचे डब्बे फुटल्याने आगीचे लोळ आकाशात पसरत होते. तर ऑईलचे काही डब्बे जवळच्या इमारतींवर जाऊन आपटत होते.

ही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज आहे. मात्र मध्ये मध्ये पाण्याची कमतरता भासत असल्याने, आग विझवण्यात खंड पडत होता. त्यामुळे आग आणखी भडकत राहिली.

दुसरीकडे जवळच्या इमारतीमधील गोदामात मोठ्या प्रमाणात कपड्याचे तागे आहेत. ते सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरु आहे.

ही आग संपूर्ण विझविण्यासाठी 24 तासांहून अधिक काळ लागणार असल्याचा अंदाज अग्निशमन दलाचे अधिकारी राजेश पवार यांनी दिली . परंतु आगीचे कारण अजून स्पष्ट झाले नसून, घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.