मुंबई : मुंबईत सुरु असलेलं आगीचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाही. सत्र न्यायालयाच्या इमारतीला लागलेली आगीची घटना ताजी असतानाच काल मध्यरात्री रे रोड परिसरात एका दुकानाला भीषण आग लागली. सुदैवानं यात कोणती जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत ७ दुकानं जळून खाक झाली आहेत.


काल (सोमवार) रात्री उशिरा रे रोडवरील 7 दुकानांना भीषण आग लागली. या दुकानांमध्ये वेल्डिंगचं काम सुरु असायचं. मिळालेल्या माहितीनुसार, येथील एका दुकानात सिलेंडरचा स्फोट झाला आणि अवघ्या काही क्षणात सातही  दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. गेल्या 31 दिवसातील आगीच्या घटनांमध्ये आतापर्यंत 31 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली होती हे अग्निशमन दलाकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.