नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो, ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले.

सायन-पनवेल मार्गावर अपघातांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या अपघातानंतर नेरूळ पोलीस ठाण्यात सायन-पनवेल टोलवेज कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीच्या चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सायन-पनवेल मार्गाचं रूंदीकरण करून तीन वर्ष होत आली असून मोठ्या प्रमाणात खड्डे या मार्गावर पडलेले आहेत. अनेक ठिकाणी लाईट बंद अवस्थेत आहेत.

पुलावर खड्डे बुजवण्यासाठी डांबरीकरण करण्यात आलं असलं तरी प्रमाणापेक्षा जास्त डांबराचा वापर करण्यात आल्याने रस्ता गुळगुळीत झाला आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर वाहणांना ब्रेक लागत असल्याने अपघाताचं प्रमाण वाढलं आहे.

गेल्या महिनाभरात 40 पेक्षा अधिक अपघात झाले आहेत. काम निकृष्ट दर्जाचं करणाऱ्या कंपंनी विरोधात कडक कारवाई करून अर्धवट काम करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

संबंधित बातमी : नेरुळ पुलावर भीषण अपघात, मासे गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड