मुंबई: शाडू मातीला विरोध नाही, पण प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) वरील बंदीची महाराष्ट्रात सरसकट अंमलबजावणी केल्यास गणेशमूर्तीकारांवर बेरोजगारीची वेळ येईल. मोठी आर्थिक उलाढाल करणारा हा उद्योग अडचणीत येईल, तसेच मुर्ती उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने पर्यावरणाचा समतोल राहील व मुर्ती पण उपलब्ध होतील असा व्यवहार्य तोडगा काढावा, अशी विनंती करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने काल (2 जून रोजी) रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पिओपीवर बंदी आल्यानंतर गतवर्षी  शासनाने तज्ज्ञांच्या समितीची स्थापना केली आहे. तसेच यावर्षीचा गणेशोत्सव आता अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपला आहे. आता मुर्ती कारखान्यांचे काम वेगात सुरू झाले असून सरसकट बंदी घातल्यास हा संपूर्ण व्यवसाय अडचणीत येणार आहे. यावर अवलंबून असलेले कारागीर बेरोजगार होतील, शिवाय रंग व मुर्तीला लागणारे इतर साहित्य असे अशी कोट्यवधीची उलाढाल या व्यवसायात होते. 


एका रायगड जिल्ह्यातील पेण तालुका आणि त्याच्या आजूबाजूच्या भागाला गणेशमूर्तींचे हब मानले जाते.  येथील गावांत वर्षभर घराघरांत ६ इंच ते १२ फूट उंचीच्या मूर्ती तयार करण्याचे काम चालते. या भागात असे १६०० उद्योग आहेत. त्यांचा वार्षिक व्यवसाय २५० ते ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तेथे दरवर्षी ३ ते ३.२५ कोटी मूर्ती तयार होतात. त्यापैकी १.२५ कोटी मूर्ती गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू या सहा राज्यांच्या ठोक व्यापाऱ्यांना दिल्या जातात. शिवाय मुंबई, ठाणे आणि राज्यात ठिकठिकाणी कारखाने असून त्यांची उलाढाल मोठी आहे. त्यामुळे पिओपीवर सरसकट बंदी घातल्यास आर्थिक फटका ही बसणार आहे. शिवाय ऐनवेळी मुर्ती उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे गणेशोत्सवात अडचणी निर्माण होतील म्हणून याबाबत पर्यावरणाचा समतोल ही राखला जाईल व व्यवसाय पण अडचणीत येणार नाही अशा प्रकारे शासनाने तोडगा काढावा अशी विनंती  यावेळी शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अखिल सार्वजनिक उत्सव समितीच्या (महाराष्ट्र) सदस्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.


पर्यावरण हाही महत्त्वाचा मुद्दा- आशिष शेलार


पर्यावरण हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहेच. त्यामुळे पर्यावरण पुरक शाडू मातीच्या मुर्ती असाव्यात, असा आग्रह हा योग्य आहे, त्याला आमचा विरोध नाही.  पण त्यासाठी लागणारे कुशल कारगीर, मातीची उपलब्धता, त्याला लागणारा वेळ आणि मुर्तीची वाहतूक करताना येणाऱ्या अडचणी असे विविध मुद्दे आहेत. या सगळ्या अडचणींवर सरकारने तोडगा काढण्याची गरज आहे, असे मत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे.


महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन स्थापना होणार-


दहिहंडी उत्सव आणि दहिहंडी साहसी खेळ आणखी मोठ्या स्वरुपात साजरा करण्यात यावा यासाठी  "महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन"ची स्थापना करण्यात येत आहे. सदैव खंबीर पाठिंबा देणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकामी मदत करावी, अशी मागणी करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. असोसिएशनची स्थापना झाल्यास या खेळाला भव्य स्वरुप प्राप्त होईल, अशी भूमिका समन्वय समितीच्या सदस्यांसह बैठकीत मांडली.