Mumbai North Lok Sabha Constituency Election Result 2024 : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) विजयी झाले आहेत. पीयूष गोयल यांनी काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील (Bhushan Patil) यांचा एक लाखाहून अधिक मताधिक्याने पराभव केला आहे. विजयाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. मात्र, गोयल यांनी दोन लाख 4 हजार 492 मतांनी पीयूष गोयल आघाडीवर असून मतमोजणीच्या काही फेऱ्या अद्याप शिल्लक आहेत.
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ (Mumbai North Lok Sabha Election) हा भाजपच्या उमेदवारासाठी सर्वात सुरक्षित लोकसभा मतदारसंघापैकी समजला जाणारा हा मतदारसंघ आहे. भाजपने या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांना मैदानात उतरवले. तर काँग्रेसने स्थानिक उमेदवार भूषण पाटील (Bhushan Patil) यांना मैदानात उतरवले. या लोकसभा मतदारसंघात बिगर मराठी भाषिक मतदारांची मोठी संख्या आहे. मागील दोन टर्म पासून या मतदारसंघात भाजपने एकहाती बाजी मारली होती. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात घट झाली आहे. यंदा 57.02 टक्के इतके मतदान झाले. एकूण 10 लाख 33 हजार 241 मतदारांनी मतदान केले.
मुंबई उत्तर लोकसभा निकाल 2024 (Mumbai North Lok Sabha Election Result 2024)
उमेदवाराचे नाव | मिळालेली मते | निकाल |
पीयूष गोयल - भाजप | 3 लाख 91 हजार 231 मते | विजयी आघाडी |
भूषण पाटील - काँग्रेस | 1 लाख 86 हजार 739 |
मतदानात घट
यंदाच्या निवडणुकीत सगळ्याच विधानसभा मतदारसंघात मतदानात एक ते 5 टक्क्यांची घट झाली. या मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा क्षेत्रात भाजप-शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. तर, एका मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे. या मतदारसंघात मराठी मतदारांसह गुजराती,उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. जैन, मुस्लिम अशा अल्पसंख्याक मतदारांचीही संख्या लक्षणीय आहे. गुजराती मतदार हा भाजपच्या पाठिशी असल्याचे चित्र असते.
विधानसभानिहाय किती मतदान झाले?
बोरिवली - 62.50 टक्के
दहिसर - 58.12 टक्के
मागाठणे - 55.66 टक्के
कांदिवली पूर्व - 54.48 टक्के
चारकोप - 57.83 टक्के
मालाड पश्चिम - 53.52 टक्के
काँग्रेसकडून उशिराने उमेदवार जाहीर
लोकसभा निवडणुकीत यंदा उत्तर मुंबईत काँग्रेसला शिवसेना ठाकरे गटाची साथ मिळाली. त्यामुळे बहुतांशी मराठी मते काँग्रेसकडे वळली. तर, भूषण पाटील स्थानिक उमेदवार असल्याचा मुद्दा प्रचारात आणला गेला. काँग्रेसची संघटना काहीशी विस्कळीत असली तरी शिवसेना ठाकरे गटामुळे काँग्रेसने निवडणुकीत आव्हान निर्माण केल्याचे चित्र होते. या मतदारसंघात काँग्रेसची जवळपास दोन ते अडीच लाख मते कायम राहिले असल्याचे चित्र मागील दोन लोकसभा निवडणुकीत दिसले होते. मात्र, पीयूष गोयल यांच्या तुलनेत उशिराने उमेदवारी जाहीर झाल्याने भूषण पाटील यांना प्रचारासाठी कमी अवधी मिळला. त्याचा परिणाम काँग्रेसच्या मतांवर झाला असण्याची दाट शक्यता आहे.
2019 चा निकाल काय होता? (Mumbai North Lok Sabha Constituency Result 2019)
2019 च्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. या निवडणुकीत शेट्टी यांना 7, 06,678 मते मिळाली. तर, उर्मिला मातोंडकर यांना 2,41,431 मते मिळाली. 2014 च्या निवडणुकीत भाजपने आमदार गोपाळ शेट्टी यांनी मोदी लाटेत काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांचा मोठा पराभव केला. शेट्टी यांना 6,64,004 मते मिळाली. तर, दुसरीकडे संजय निरुपम यांना 2,17,422 मते मिळाली. एकूण मतदानापैकी शेट्टी यांनी 70.15 टक्के मते मिळवली.
कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचे आमदार 2019 प्रमाणे...
बोरिवली - सुनील राणे - भाजप
दहिसर - मनिषा चौधरी - भाजप
मागाठणे - प्रकाश सुर्वे - शिवसेना-शिंदे गट
कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर- भाजप
चारकोप - योगेश सागर - भाजप
मालाड पश्चिम - अस्लम शेख - काँग्रेस