मुंबई : जीएसटीचा कायदा देश आणि राज्याच्या हिताचा असून, जीएसटीमुळे करचोरीला आळा बसणार आहे, असे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवीर यांनी सांगितले. एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटीवर मनमोकळा संवाद साधत अनेक प्रश्नांचं निरसन केलं.
जीएसटीमुळे सध्या आकारण्यात येणाऱ्या 17 करांमधून मुक्ती मिळणार आहे. शिवाय, लघु उद्योगांना कर लागण्याची शक्यताही कमी आहे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
अवाजवी व्यवहार, खोट्या बिलांवर आळा बसेल. कच्चं बिल-पक्कं बिल ही पद्धतही जीएसटीमुळे मोडीत निघणार आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
जीएसटीमध्ये शेतकऱ्यांना अनेक दिलासादायक गोष्टी आहेत. कृषीक्षेत्रावर जीएसटी कायद्याचा कुठलाही भार नसेल, असेही ते म्हणाले.
जीएसटी संपूर्ण राज्याच्या हिताचा आहे, कुठल्या एखाद्या पक्षाच्या हिताचा नाही. राज्याची आर्थिक शक्ती, विकासदर वाढेल, असेही त्यांनी सांगितले.