ठाणे : राजस्थानच्या उदयपूरमधील फायनान्स कंपनीच्या दोघा संचालकांचं अपहरण करुन एक कोटीची खंडणी मागणाऱ्या कथित पत्रकारासह सहा जणांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. या टोळीच्या तावडीतून दोघा संचालकांची सुखरुप सुटका करण्यात आली. खंडणीसाठी उकळलेले 25 लाख रुपये, पाच तलवारी आणि एक गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.
लेनिन मुरली कुट्टीवटे (40, कोलशेवाडी, कल्याण), रोहित राजाराम शेलार (20, कल्याण), सागर साळवे (37, दिवा सागवे गाव), ओमप्रकाश जैस्वाल (23, लोकमान्य नगर, ठाणे), अभिषेक झा (40, कल्याण) आणि तुकाराम कुशाबा मुदगन (43, कल्याण) अशी अटक केलेल्या सहा खंडणीखोरांची नावं आहेत. साळवे हा 'पोलिस महानगर' नामक एका साप्ताहिकाचा पत्रकार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली. सर्व आरोपींना ठाणे न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
उदयपूरमध्ये राहणाऱ्या देवानंद वरंदानी आणि रोनक सैनी या दोघा व्यापाऱ्यांची 'श्री तिरुपती फायनानिक्स निधी लिमिटेड' नावाची कंपनी असून ते प्रॉपर्टी गहाण ठेवून कर्ज देतात. या कंपनीचा नंबर मिळवून आरोपींनी दोघांशी संपर्क साधला आपण बांधकाम व्यावसायिक असल्याचं आरोपींनी भासवलं.
आपल्याला बांधकामासाठी मोठं कर्ज हवं असल्याचं सांगून दोघांना ठाण्यात प्रॉपर्टी दाखवण्यासाठी बोलावण्यात आलं. दोन्ही संचालक सात सप्टेंबरला ठाण्यात आल्यावर त्यांचं स्टेशनसमोर असलेल्या अशोक टॉकीज परिसरातून अपहरण करण्यात आलं.
त्यानंतर त्यांना डोंबिवलीतील एका इस्टेट एजंटच्या कार्यालयात नेण्यात आलं. दोघा संचालकांना तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडून एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी आरोपींनी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
खंडणीची रक्कम तडजोडी अंती 25 लाख रुपये ठरवण्यात आली. त्याप्रमाणे अपहरण केलेल्या व्यापाऱ्यांच्या एका मित्राला 25 लाखांची रोकड घेऊन आरोपींनी कल्याणला बोलवलं. रोकड घेऊन आलेल्या व्यक्तीला आरोपींनी 8 सप्टेंबरला संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास कल्याणला आपल्या गाडीत बसवलं.
पैसे घेऊन आलेल्या व्यक्तीने चतुराईने आरोपींच्या कारचा क्रमांक आपल्या बोरीवलीतील मित्राला पाठवला. संबंधित मित्राने ही घटना त्वरित ठाणे खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना सांगितली. त्यानंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाने सापळा लावून कल्याणमधून त्यांची कार ताब्यात घेतली. त्यातून लेनिन मुरली कुट्टीवटे आणि रोहित राजाराम शेलार या दोघा आरोपींना अटक केली.
आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार दोघा व्यापाऱ्यांची सुटका पोलिसांनी केली. याचवेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन 5 तलवारी, एक कार, व्यापाऱ्यांकडून घेतलेली 70 हजारांची रोकड, एक चेन, एक अंगठी असा ऐवज जप्त केला.