मुंबई : मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या एलिफंटा लेण्या आणि सगळं घारापुरी बेट आता प्रकाशमान होणार आहे. कारण स्वातंत्र्यानंतर  पहिल्यांदाच या बेटाला २४ तास वीजपुरवठा मिळणार आहे. आज (गुरुवार) संध्याकाळी ६ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी इथल्या विद्युतप्रकल्पाचं उद्घाटन करतील.


या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते, राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुनिल तटकरे, जयंत पाटील हेही उपस्थित राहणार आहेत.

मुंबईपासून समुद्रात अवघ्या १० किलोमीटरवर असूनही हे बेट विद्युतीकरणापासून अनेक वर्ष दूर होतं. डिझेल जनित्राद्वारे या बेटाला विद्युत पुरवठा होत होता. मात्र, आता इथं विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. पहिल्यांदाच समुद्राच्या तळाखालून विद्युतवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या विद्युतीकरणाचा बेटावरील शेतबंदर, मोराबंदर, राजबंदर इथल्या ९५० नागरिकांना फायदा होणार आहे.

एलिफंटाची वैशिष्ट्ये :

- एलिफंटा लेणीला घारापुरी लेणीही म्हणतात

- मुंबईपासून 10 किमीवर एका लहान बेटावरच्या डोंगरात ही लेणी आहेत.

- निर्मितीचा काळ साधारण इसवी सन ९०० ते १३००च्या दरम्यानचा

- या लेण्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थानाचा दर्जा

- या लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीच्या आकाराचे प्रचंड असे एक शिल्प होते, त्यावरुनच या लेण्यांना एलिफंटा हे नाव पडलं

- सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं

- शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केलं होतं

- १७७४ मध्ये त्यावर इंग्रजांनी सत्ता काबीज केली