Bombay High Court : पती पत्नीमधील भांडण आणि विकोपाला गेलेल्या वाद पाहता काही लग्नगाठी स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात, अशी संतप्त प्रतिक्रिया मुंबई उच्च न्यायालयानं नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीदरम्यान दिली. निर्दयीपणा आणि हुंड्याबाबत पत्नीनं दाखल केलेल्या तक्रारीवर न्यायालयानं आरोपी पतीला अटकपूर्व जामीन मंजूर करताना या प्रकरणावर कडक ताशेरे ओढलेत. नवरा-बायकोमध्ये लहान-सहान कारणांवरून वाद, भांडणं हे होत असतात. काही विवाहित जोडप्यांमध्ये सतत वाद होत असतात, ज्यात त्यांचे संसार तुटून ते विभक्त होतात. त्यामुळे काही लग्नाच्या गाठी या स्वर्गात नाही तर नकरात बांधल्या जातात, अशी संतापजनक आणि तिखट टिप्पणी हायकोर्टानं या निकालात नोंदवली आहे. 


काय आहे प्रकरण -
नवी मुंबईत राहणाऱ्या एका जोडप्याचं साल 2017 लग्न झालं. त्यांना आता तीन वर्षांचा मुलगादेखील आहे. लग्न ठरवताना याचिकाकर्ता पतीकडून पत्नीच्या घरच्यांकडे एक सोन्याच्या नाण्यांची मागणी करण्यात आली होती. मात्र, तिच्याकडून त्यास नकार देण्यात आला. त्यानंतर याचिकाकर्त्यांच्या घरच्यांनी पत्नीला याची सारखी आठवण करून देण्यास सुरुवात केली. याचिकाकर्ता पत्नीला पती त्यावर वारंवार शिवीगाळही करत असे. नोव्हेंबर 2019 मध्ये वाशीत घर खरेदीसाठी तिनं पतीला 13 लाख 50 हजार रुपये दिले. मात्र, तरीही पतीकडून पैशांची मागणी काही थांबत नव्हती. एकेदिवशी पत्नीनं आपल्यावर हल्ला केल्याचं सांगत त्याने स्वतःला काही जखमाही करून घेतल्या आणि पत्नीचे 4 लाख 20 हजारांचे दागिने विकून टाकले. या जाचाला कंटाळून पत्नी आपल्या बहिणीकडे राहायला गेल्यानंतर त्याने तिथेही तिला गाठून त्रास देण्यास सुरूवात केली. खोटे आरोप करून पोलिसांत तिच्याविरोधात मुलाला भेटायला देत नाही म्हणून तक्रारही दाखल केली. या सगळ्याला कंटाळून अखेर पत्नीनं भारतीय दंड संहितेअंतर्गत 498 (अ) (पती आणि सासरच्याकडून त्रास) हुंडा प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला. त्याविरोधात पतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. 


हायकोर्टातील युक्तिवाद - 
या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर सुनावणी पार पडली. पत्नीने केलेले आरोप हे चुकीचे आणि खोटे असल्याचा दावा करत याचिकाकर्त्यांनी घर खरेदीसाठी 90 लाखांचे कर्ज घेतले. पत्नीने फक्त घरातील अंतर्गत सजावटीचा खर्च उचलला असल्याचा दावा पतीकडून करण्यात आला. तसेच लग्नानंतर याचिकाकर्त्यांनी पत्नीला मॉरिशसला नेले होते, तिला महागडा मोबाईल भेट दिला होता. तरीही ती त्याला त्रास आणि मारहाण करत होती असा दावा करत, काही व्हॉट्सअॅप चॅट्सचा संदर्भ कोर्टात सादर करण्यात आला. त्याबाबत त्यानं पोलिसांत पत्नीविरोधात अदखलपात्र गुन्हाही दाखल केल्याची माहिती देण्यात आली.



दोन्ही बाजू ऐकून घेत सदर प्रकरणात नवरा आणि बायकोमधील वाद विकोपाला गेला असून ते आता एकत्र राहणं अशक्य आहे. त्यामुळे पतीला पोलिसांच्या ताब्यात ठेऊनही प्रश्न सुटणार नाही. कारण, तपासाचा विचार करता इथं कोठडीची आवश्यकता नाही. आरोप-प्रत्यारोप हे कौटुंबिक असून तपासात सहकार्य करण्याचे निर्देश पतीला देत सुनावणीदरम्यान त्यावर निर्णयही घेतला जाऊ शकतो. असं निरीक्षण नोंदवत न्यायालयानं अटकेपासून दिलासा मान्य केला, तसेच अटक झाल्यास 30 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देशही नवी मुंबई पोलिसांना दिले आहेत.