मुंबईः भारतातील सर्वात वेगवान समजली जाणारी टॅल्गो ट्रेनची पहिली चाचणी आज दिल्ली ते मुंबई दरम्यान पार पडली आहे. दिल्लीहून रवाना झालेली टॅल्गो ट्रेन मुंबई सेंट्रल स्थानकात दाखल झाली आहे. दिल्लीहून काल रात्री 8 वाजता ही ट्रेन रवाना झाली होती.

 

 

टॅल्गो ट्रेन आज सकाळपर्यंत मुंबईत पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र गुजरातमध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे टॅल्गो ट्रेन मुंबईत 2 तास उशिरानं दाखल झाली. या चाचणीत टॅल्गो ट्रेन ताशी 130 वेगानं चालवली गेली. यानंतरही दिल्ली ते मुंबई दरम्यान अजून दोन चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

 

टॅल्गोची यशस्वी चाचणी

दिल्ली ते मुंबई मार्गावर टॅल्गोची चाचणी ही यशस्वीरित्या पार पडली असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. सूरतपर्यंत टॅल्गोची चाचणी अपेक्षित वेगाने पार पडली. मात्र पावसामुळे टॅल्गोच्या वेगावर परिणाम झाला.

 

 

टॅल्गो ट्रेनची पहिली चाचणी 130 किलोमीटर प्रतितास या वेगाने झाली. यानंतरची दुसरी चाचणी 11 ऑगस्ट आणि तिसरी चाचणी 12 ऑगस्टला होणार आहे. तिसऱ्या चाचणीत ट्रेनचा वेग 150 किमी प्रतितास असेल. साधारणतः टॅल्गो ट्रेनचा वेग हा 200 किमी प्रतितास असतो. मात्र भारतीय रेल्वे ट्रॅकची स्थिती पाहता सध्या हा वेग तुलनेने कमी ठेवला आहे. कालांतराने ट्रेनचा वेग वाढवण्यात येणार आहे.