मुंबई : विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी काढलेला 'उलगुलान मोर्चा' मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला आहे. आंदोलकांचा आझाद मैदानात ठिय्या सुरु आहे. मात्र आंदोलक सकाळपासून उपाशी आहेत. आंदोलनस्थळी जेवणाची व्यवस्था केलेली नाही. तर काहींनी मागण्या मान्य होईपर्यंत जेवण न करण्याचा निश्चय केला आहे.

दरम्यान आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या प्रतिभा शिंदे यांच्यासह 18 जणांचं शिष्टमंडळ दुपारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडणार आहेत. या शिष्टमंडळात प्रतिभा शिंदे, बी जी कोळसे-पाटील, झिलाबाई, पारोमिता गोसावी, भरत बारेला, पन्नालाल मावळे, सचिन धांडे, राजेंद्र गायकवाड, केशव वाघ, दिपू पवार, बुधा बारेला, काथा वसावे, सुकलाल तायडे, यशवंत पाडवी, फिरोज मिस्त्रीबोरवाल, एकनाथ शिंदे, ज्योती बडेकर, धनंजय शिंदे यांचा समावेश आहे.

दरम्यान, आंदोलकांनी बुधवारी सोमय्या मैदानात मुक्काम केला. त्यानंतर सरकारविरोधी घोषणा देत हे शेतकरी सकाळी आज पहाटे साडेचारच्या सुमारास आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले. या विराट मोर्चात महिला, पुरुषांसह वृद्ध आणि लहान मुलंही सहभागी झाले आहेत.

वनाधिकार कायदा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा विविध मुद्द्यांवर सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्याने हा मोर्चा काढण्यात आला आहे. "सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करु आणि गरज पडल्यास जेलभरो आंदोलनही करु," असा इशारा प्रतिभा शिंदे यांनी दिला आहे.



आझाद मैदानात ठिय्या
राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी मोर्चात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आझाद मैदानावरुन उठणार नाही, अशी निर्धार त्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांची प्रकृती बिघडली
या मोर्चातील सुमारे 400 आंदोलकांची तब्येत बिघडली आहे. सरकारकडून त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. काही संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. खाण्यापिण्यासह औषधं त्यांना पुरवली जात आहे. ठाण्यातून मुंबईच्या दिशेने अनवाणी येणाऱ्या या शेतकऱ्यांच्या पायांना जखमा झाल्या आहे. तर काही जण तापामुळे आजारी पडले आहेत.

मागण्यांवर तोडगा काढू : महाजन
दरम्यान, मागण्यांवर आम्ही लवकरात लवकर तोडगा काढू, असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांना दिलं आहे. गिरीश महाजनांनी रात्री उशिरा सोमय्या मैदानावर जाऊन आंदोलकांची भेट घेतली. "आमच्या सरकारकडून लोकांच्या अपेक्षा आहेत, म्हणून विविध संघटना आणि घटकांचे मोर्चे निघत आहेत," असा दावा महाजनांनी केला.