साकीनाका: मागील काही दिवसांमध्ये महिलांसंबधी गुन्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं चित्र आहे. अशातच एका महिला वकिलाला व्हिडीओ कॉलसमोर विवस्त्र केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या शरीरावरील जखमा, बुलेट मार्क तपासण्याचा बहाण्याने महिलेला विवस्त्र करून तिच्याकडून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.(Crime News)


मनी लाॅण्ड्रिंग गुन्ह्यात पकडलेल्या मुख्य आरोपीच्या साथीदारांमध्ये तुम्हीदेखील आहात, त्यांच्या अंगावर असणारी लहान हत्यारे आणि त्यामुळे झालेल्या जखमा, बुलेट मार्क तुमच्या अंगावरही आहेत का, हे आम्हाला पाहायचं आहे, असं सांगत शारीरिक तपासणीच्या नावाखाली 36 वर्षीय महिला वकिलाला व्हिडीओ कॉलसमोर विवस्त्र (Crime News) होण्यास भाग पाडण्यात आलं. तसेच या महिलेकडून 50 हजार रुपये देखील घेतले असल्याची माहिती आहे. याप्रकरणी महिला वकिलाच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंदवला आहे. 


नेमकं काय घडलं?


साकीनाकामध्ये राहणाऱ्या महिला वकिलाला एकाने फोन करत तो टेलिकॉम ऑथरिटी ऑफिसमधून बोलत असल्याचा दावा करण्यात आला. तुमच्या मोबाइलमध्ये असलेल्या सिम कार्डमार्फत मनी लाॅण्ड्रिंग केली जात असून, नंबर ब्लॉक करण्याची भीती देखील घालण्यात आली. त्याचबरोबर तुमच्या विरोधात अंधेरी पोलिसात एफआयआर दाखल झाला असून, त्यांच्याकडून स्पष्टीकरण येताच तुमचा फोन बंद करणार नाही, असं देखील सांगण्यात आलं. आरोपीने अंधेरी पोलिस अधिकारी म्हणून अनोळखी व्यक्तीला कॉन्फरन्स कॉल जोडला. (Crime News)


समोरून फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने आपण सायबर सेलचा प्रमुख असून, तुमच्या कॅनरा बँकेतील खात्यात मनी लाॅण्ड्रिंग झाल्याचे त्याने सांगितले. त्यावर, माझे खाते नसल्याचे तक्रारदार महिलेने स्पष्ट केल्यावर वरिष्ठांनी तुम्हाला तात्काळ अटक करायला सांगितले असून, तुम्ही चौकशीत सहकार्य केले, तर मी तुमची मदत करू शकतो, असं त्याने सांगितलं.


आरोपींनी तक्रारदाराला तुमची गुप्त चौकशी सुरू असून, तुमच्या शिवाय कोणीही नसेल, अशा ठिकणी जा, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार महिलेने पवईतील एका हॉटेलमध्ये रूम भाड्याने घेतली. तेथे व्हिडीओ कॉलवर बोलणाऱ्या व्यक्तीने या केसमध्ये नरेश गोयल हा मुख्य आरोपी आहे तसेच, त्याच्या साथीदार महिलांच्या अंगावर छोटी हत्यारे ठेवण्यात आलेली होती. तसेच शरीरावर जखमांचे व बुलेट लागल्याचे मार्क आहेत. त्यामुळे आमच्या महिला अधिकारी व्हिडीओ कॉलवर त्या खुणा तपासतील, असे सांगत शारीरिक तपासणीच्या नावाखाली वकिलाला व्हिडीओ कॉल समोर कपडे काढायला लावले. त्यांनी तसेच व्हिडीओ कॉल समोर विवस्त्र झाल्यानंतर त्यांच्याकडून 50 हजार रुपये ऑनलाइन उकळण्यात आले. तक्रारदार महिलेने संपुर्ण प्रकार आपल्या पतीला सांगितला.