मुंबई : मुंबईत विविध ठिकाणी कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी तात्पुरती रुग्णालयं (फिल्‍ड हॉस्पिटल) उभारली आहेत. या केंद्रांमध्ये ऑक्सिजन पुरवठा व अतिदक्षता उपचार (आयसीयू) कक्ष देखील आहेत. मात्र, पुरेशा तज्ज्ञ वैद्यकीय मनुष्यबळाअभावी यांपैकी बीकेसी कोविड सेंटर फेज 2 लोकार्पणानंतरही अनेक दिवस सुरुच होऊ शकले नाही.


मात्र, आता बीएमसीनं आवश्यक तज्ज्ञ वैद्यकीय मनुष्यबळाचं आऊटसोर्सिंग करायचं ठरवलं आहे. ज्यामुळे कोविड सेंटर्समध्ये प्रत्यक्षात रुग्णांवर चांगले उपचार होऊ शकतील. वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया कोरोना उपचार केंद्रातील 50, वांद्रे-कुर्ला संकुलातील केंद्रात 112, गोरेगांव (पूर्व) येथील नेस्को केंद्रात 250, मुलुंड येथील केंद्रात 100 आणि दहिसर येथील केंद्रात 100 अशा 5 ठिकाणी मिळून 612 अतिदक्षता उपचार रुग्‍णशय्या (आयसीयू बेड) वर कोरोना बाधितांना उपचार देण्यासाठी हे मनुष्यबळ उपलब्ध असेल.


महानगरपालिकेच्या संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) यांनी निश्चित केल्यानुसार 10 आयसीयू बेडसाठी 1 वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार (सीनियर कन्सल्टंट), 1 सहाय्यक वैद्यकीय सल्लागार (असोसिएट कन्सल्टंट), 6 निवासी वैद्यकीय अधिकारी (रेसिडंट मेडिकल ऑफिसर्स), 10 परिचारिका (नर्सेस), रुग्णांची काळजी घेण्यासाठी 8 सहाय्यक (मल्टी पर्पज वर्कर्स), 2 तंत्रज्ञ यांची आवश्यकता असेल.


संबंधित 5 भव्य कोरोना आरोग्य केंद्रांतील आयसीयू बेडस्‌वर रुग्णसेवा करण्यासाठी, आयसीयू व्यवस्थापन करण्याचा तज्ज्ञ अनुभव असलेल्या कॉर्पोरेट हॉस्पिटल, वैद्यकीय संस्था व व्यावसायिक, खासगी कंपन्या, भागीदारी संस्था, बिगर शासकीय संस्था, विश्वस्त संस्था यांच्याकडून महानगरपालिका प्रशासनाने अर्ज मागवले होते. त्याची आवश्यक ती सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन मनुष्यबळ नियुक्त करण्याची कार्यवाही आता पूर्ण करण्यात आली आहे.


सदर बाह्यसेवा या फक्त वैद्यकीय व निमवैद्यकीय मनुष्यबळापुरत्याच मर्यादित आहेत. हे मनुष्यबळ सतत कार्यरत राहून रुग्णांची सेवा व त्याची देखभाल करेल. संबंधित कोरोना आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधा, तेथील औषधी पुरवठा व इतर सेवा-सुविधा या सर्व बाबी महानगरपालिका प्रशासनाकडूनच सांभाळल्या जाणार आहेत. प्रारंभी 6 महिने किंवा कोविड 19 संसर्ग संपुष्टात येईपर्यंत, यापैकी जे आधी घडेल, त्या काळापर्यंत या बाह्यसेवा सुरु राहतील.


BKC Covid Center | BKC MMRDA सेंटरमध्ये डॉक्टरांचा तुटवडा, हजारो बेड्स मात्र एकही रुग्ण का नाही?