मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही पण सभा मोठी व्हायची, पण त्यांना तितकी मतं मिळायची नाही. त्याप्रमाणेच प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या बहुजन वंचित विकास आघाडीलाही मतं मिळणार नाहीत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.

प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या भारिप-एमआयएमच्या बहुजन वंचित विकास आघाडीची पहिली सभा काल औरंगाबादेत पार पडली. त्या सभेला प्रचंड गर्दी होती.  त्याबाबत बोलताना आठवले म्हणाले, "प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित विकास आघाडीचा विशेष परिणाम होणार नाही, याउलट त्याचा आम्हाला फायदाच होईल. डॉ. प्रकाश आंबेडकरांना फायदा झालाच तर अकोल्यात होईल, त्याबाहेर होणार नाही"

“प्रकाश आंबेडकरांसोबत नेते असतील, पण कार्यकर्ते आणि जनता आमच्याबरोबर आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही पण सभा मोठी व्हायची, पण त्यांना तितकी मतं मिळायची नाहीत, असं म्हणत आठवलेंनी कालच्या गर्दीच्या प्रश्नावर उत्तर दिलं.

सगळी मुस्लिम मतं त्यांना आंबेडकर-ओवेसींना मिळतील असं काही नाही. आम्हाला पण मतं मिळतील. ओवेसी भाजपला मदत करतात हा त्यांच्यावर ठपका आहे. काँग्रेसनेही मुस्लिम समाजासाठी काही केलं नाही, त्यामुळे ही मतं आम्हाला मिळावी म्हणून आम्ही रणनीती आखू, असं आठवलेंनी नमूद केलं.

बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या उंचीबाबत प्रतिक्रिया

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या स्मारकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. मात्र रामदास आठवले यांनी हा आरोप फेटाळला आहे.

पुतळ्याची उंची ही चौथऱ्यापासून मोजायची असते. आनंदराज आंबेडकर यांना रस्त्यावर उतरण्याची गरज नाही. पुतळ्याची उंची वाढवणासाठी काही करता येईल, त्यासाठी प्रयत्न करु. याचं राजकारण करू नये, असं आठवले म्हणाले.

इंधन दरवाढीवर नाराजी

यावेळी रामदास आठवले यांनी पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीवर नाराजी व्यक्त केली. इंधन दरवाढीमुळे सामान्य माणसाला त्रास होत आहे. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे इतर वस्तूंच्या किंमती वाढत आहे. मी स्वतःपंतप्रधानां बोलेन,पेट्रोल, डिझेल, जीएसटीच्या कक्षेत आलं पाहिजे, अशी भूमिका एनडीएच्या बैठकीत मांडणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.


संबंधित बातम्या

मुस्लिम-बहुजनांनो, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक व्हा : ओवेसी  

औरंगाबादमध्ये अनुसुचित जाती-मुस्लीम ऐक्याचा एल्गार