भूपेंद्र वीरा हत्येप्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाची कबुली
एबीपी माझा वेब टीम | 20 Oct 2016 07:36 AM (IST)
मुंबई : मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या हत्येप्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाने हत्येची कबुली दिली आहे. रझाक खान यांचा मुलगा अमजद खानने आपण हत्या केल्याचा कबुलीजबाब दिला आहे. भूपेंद्र वीरा यांची हत्या आपण केली असून, वडील रझाक खान यांचा या हत्येशी काहीही संबंध नाही, असं अमजदने सांगितल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 72 वर्षीय भूपेंद्र वीरा यांची रविवारी कालिन्यातील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनंतर पोलिसांनी माजी नगरसेवक रझाक खान आणि त्यांचा धाकटा मुलगा अमजदला दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर झालेल्या चौकशीत अमजदने ही धक्कादायक कबुली दिली आहे. मात्र आपल्या पित्याच्या बचावासाठी अमजद हत्येचा आरोप आपल्यावर घेत आहे का, याचाही तपास केला जात आहे. हत्येच्या वेळी वीरा यांची पत्नी स्वयंपाकघरातच होती. ज्या बंदुकीतून गोळीबार झाला, तिला सायलेंसर लावण्यात आला नव्हता, मात्र टीव्हीच्या गोंगाटात एकच गोळी झाडल्यामुळे कोणालाच ती ऐकू न गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ज्या बंदुकीतून वीरा यांच्यावर गोळीबार झाला, ती जप्त केल्याशिवाय अधिक माहिती देता येणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. पिता रझाक खान यांनी केलेली बांधकामं अनधिकृत असल्याच्या आरोपातून वीरा यांनी अनेक आरटीआय दाखल केल्या होत्या. यामुळे रझाक यांचा मुलगा अमजद नाराज असल्याचं म्हटलं जातं.