Yashwant Jadhav : शिवसेना नेते यशंवत जाधव यांच्या अडचणी थांबायच्या नाव घेत नाहीत. आयकर विभागाच्या छाप्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने यशवंत जाधव यांना समन्स बजावला आहे. यशवंत जाधव यांच्या परदेशातील गुंतवणुकीची चौकशी होण्याची शक्यता आहे. ईडीकडून फेमा कायद्याअंतर्गत जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावण्यात आलं आहे. आयकर विभागाने यशवंत जाधव यांची जी चौकशी केली, यासोबतच कंपनी व्यवहार मंत्रालय अर्थात मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सने त्यांच्या बेनामी कंपनीची चौकशी केली असता, काही मोठी रक्कम त्यांच्या जवळच्या लोकांच्या माध्यमातून गुंतवणूक केली आहे. ही कशी केली होती याची चौकशी ईडी करणार आहे. आयकर विभागानेही याबाबत यशवंत जाधव यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं आहे.


शिवसेनेचे मुंबईतील महत्त्वाचे नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या घरावर काही महिन्यांपूर्वी आयकर विभागाने छापा मारला होता. जानेवारी महिन्यात भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. त्यानंतर आयकर खात्याने जाधव यांच्या घरावर छापा मारला होता. त्यानंतर यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला होता.  


रोख रक्कम देऊन 6 कोटींच्या दागिन्याची खरेदी 


यशवंत जाधव प्रकरणात आयकर खात्याच्या चौकशीत आणखी काही बाबी उघड झाल्या आहेत. गेल्या 10 दिवसांत तपासाला वेग आला आहे. जाधव यांच्या एकूण संपत्तींची संख्या आता 53 वर पोहचली आहे. यात कैसर बिल्डींगचा समावेश आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी ही इमारत खरेदी करण्यात आली. या एकट्या इमारतीतून 80 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार उघडकीस आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या 10 दिवसांत आयकर खात्याने प्रत्यक्ष ठिकाणांवर जाऊन स्पॉट तपास करत खातरजमा केली आहे. या चौकशी दरम्यान काही व्यक्तींनी शपथेवर कबुलीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  यशवंत जाधव यांनी काही ज्वेलर्सकडून 6 कोटींच्या दागिन्यांची खरेदी केली. ही खरेदी संपूर्ण रक्कम रोखीने करण्यात आली. यामध्ये एका मध्यास्थामार्फत 1.77 कोटींच्या दागिन्यांची खरेदी करण्यात आली होती. या व्यवहारातही रोखीने पैसे स्वीकारल्याची कबुली या संबंधित ज्वेलर्सने दिली आहे. 


संबंधित बातम्या


Yashwant Jadhav Property Seized : यशवंत जाधवांच्या संपत्तीवर टाच; 41 मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त, कोट्यवधींच्या मालमत्तांचा समावेश


Yashwant Jadhav : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्रीशिवाय आणखी 'ही' दोन नावे; चर्चांना उधाण


Yashwant Jadhav : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढणार! कंपनी व्यवहार मंत्रालयाचं मुंबई पोलिसांना पत्र