Price Hike Protest : वाढती महागाई आणि बेरोजगारीविरोधात राज्यासह देशभरात डावे पक्ष आणि संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे. आजपासून 25 मे ते 31 मे पर्यंत विविध पातळीवर आंदोलन करण्यात येणार आहे.  हे आंदोलन महाराष्ट्रात जोरदारपणे यशस्वी करावे, अशी हाक राज्यातील डाव्या पक्षांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले होते. 


केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील केंद्र सरकार सातत्याने जनताविरोधी राबवत आहे. ही धोरणे कॉर्पोरेटधार्जिणे असून जनतेचे हाल होत असल्याची टीका डाव्यांनी केली आहे. सरकारकडून धर्मांधतेला उत्तेजन देणारी धोरणे सुरू असून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात  जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांवर उग्र मोर्चे, आंदोलन करण्याची हाक डाव्यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी सीपीएमने इंधन दरवाढीच्या विरोधात पेट्रोल पंपासमोर दोन तासांचे सत्याग्रह आंदोलन केले होते.


शेतकरी कामगार संघटनाही होणार सहभागी


केंद्र सरकारच्या जनविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांविरुद्धमहाराष्ट्रभर शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला संघटित करून प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर प्रचंड मोर्चे व निदर्शने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शेतकरी-कामगार मोर्चाच्यावतीने देण्यात आली. शेतकरी-कामगार संघटनाही डाव्यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहे. 


दरम्यान, सरकारी आकडेवारीनुसार, घाऊक महागाईचा दर गेल्या महिन्यात 15.08 टक्के होता. एक वर्षापूर्वी म्हणजेच एप्रिल 2021 मध्ये घाऊक महागाईचा दर 10.74 टक्के होता. या वाढीसह घाऊक महागाई दर नऊ वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. इंधन आणि ऊर्जा घाऊक महागाई दर 34.52 टक्क्यांवरुन 38.66 टक्के तर अन्न धान्य महागाई दर 8.71 टक्क्यांवरुन 8.88 टक्के झाला आहे.


इंधन दर नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर देशात पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. राज्य सरकारनेदेखील इंधन दर आणखी कमी करण्यासाठी व्हॅट दरात कपात करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.