मुंबई : गणेशोत्सव आणि मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची एक गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविषयी शिवसेनेच्या मंत्र्यांनी माध्यमांसमोर कोणतंही वक्तव्य करु नये अशी सक्त ताकीद एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बोलताना महायुती बाबत समन्वय साधून बोलणं अपेक्षित असल्याचं देखील बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे. तसेच गणेशोत्सव काळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचा, गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक या व्याख्येनुसार पक्षावाढीसाठी प्रयत्न करा असे निर्देश शिंदेंनी त्यांच्या मंत्र्याना दिले आहेत.

मराठा आरक्षणाचं वादळ घोंगावत असताना, मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी भाजप नेते प्रयत्नशील आहेत. संधी मिळेल त्यावेळी भाजपकडून मनोज जरांगे यांच्यावर टीका केली जात आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे वा शिवसेनेच्या मंत्र्यांनी या मुद्द्यावर मात्र मौन बाळगल्याचं दिसून येतंय.

जरांगेंचे टार्गेट फडणवीस, शिंदे मात्र गप्प

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार करत मुंबईला धडक देण्याची तयारी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. जरांगेंच्या टार्गेटवर आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. एकनाथ शिंदे मराठ्यांना आरक्षण द्यायला तयार होते, पण देवेंद्र फडणवीसांनी आडकाठी आणली, असा आरोप जरांगेंनी केला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी गेल्या आठ महिन्यात मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार केला नाही. यावरून त्यावेळीही फडणवीसांनीच काम रोखल्याचा आरोप जरांगेंनी केला.

मनोज जरांगे हे मुख्यमंत्री फडणवीसांवर सातत्यानं हल्लाबोल करत असताना एकनाथ शिंदेंनी मात्र यावर मौन बाळगलं आहे. त्यातच त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना माध्यमांवर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये अशा सूचना केल्या आहेत.

शिंदेंचा मंत्री जरांगेंच्या मदतीसाठी

एकीकडे मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू केला. त्याचवेळी दुसरीकडे शिंदेंचे मंत्री शंभुराज देसाई मात्र जरांगेंच्या मदतीला धावून आल्याचं दिसतंय. मराठवाड्याची बोलण्याची शैली तशी आहे. ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात आलं आपल्या तोंडून चुकीचा शब्द गेला, तेव्हा त्यांनी तो शब्द मागे घेतला असं शंभुराज देसाई म्हणाले.

आपण मराठा समन्वय समितीचा सदस्य असल्याचं शंभुराज देसाई म्हणाले. त्यामुळे राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये मध्यस्ती करण्याची जबाबदारी जर आपल्याला दिली तर ती पार पाडू असा विश्वासही शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.

ही बातमी वाचा: