मुंबई : गेल्या 30 तासांपासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Highway) वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असून प्रवासी चांगलेच ताटकळले आहेत. महामार्गावरील बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी (Traffic) होऊन वाहन चालकांना झालेल्या त्रासाची आता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दखल घेतली असून या पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश एमएसआरडीसी आणि पोलिसांना उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहेत. दरम्यान, आज दुपारीच सोलापूर दौऱ्यावर असताना एबीपी माझाने एकनाथ शिंदेंना या वाहतूक कोडींबाबत आणि प्रवाशांच्या गैरसोयीबाबत प्रश्न विचारला होता. 

Continues below advertisement

बोरघाटात गॅस टँकर पलटल्यामुळे ज्वलनशील प्रोपोलीन गॅसची गळती सुरू झाली होती, या गळतीमुळे आणखी धोका वाढून मोठे नुकसान झाले असते. त्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियोजन करण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळवावी लागली. शिवाय एमएसआरडीसी आणि पोलिसांनी 20 तास प्रयत्न करून गॅस गळती सुद्धा रोखली आहे, असे एकनाथ शिंदेंनी सांगितले. प्रवाशांना झालेला त्रास दुर्देवी आहे, त्यांना झालेल्या मनस्तापाची पूर्ण कल्पना आहे. पण, एमएसआरडीसीने सुद्धा तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची कुमक मागवली, त्यांनीही प्रयत्न केले. मात्र हे काम खूप आव्हानात्मक होते. जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे  भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि रिलायन्स कंपनीच्या तज्ञांना बोलवण्यात आलं. या पथकांनी गॅस गळतीवर नियंत्रण मिळवल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. 

दरम्यान, प्रवाशांना एमएसआरडीसीकडून मोठ्या प्रमाणावर पिण्याचे पाणी, बिस्किट्स देण्यात आले. सर्व अधिकारी कर्मचारी रस्त्यावर होते. एवढेच नाही तर पथकर वसुली करू नये म्हणून देखील निर्देश मी दिले असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले. वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईपर्यंत या महामार्गावरील टोल वसूली थांबविण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Continues below advertisement

मिसिंग लिंकचे काम तातडीने पूर्ण करा

मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात असून ते तातडीने पूर्ण करून हा टप्पा लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी विभागाला दिले. ही लिंक सुरू झाल्यानंतर मुंबईपुणे प्रवासातील अंतरही वाचेल त्याचप्रमाणे अशा घटना घडल्यास पर्यायी वाहतुकीचा मार्गही कामाला येईल असे सांगून त्यांनी एमएसआरडीसी त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चाही केली आणि एक आपत्कालीन आराखडा तयार करण्यास सांगितले. 

हेही वाचा

..तर खुटा उपटून मारेन, खराब रस्त्यावरुन मंत्री गुलाबराव पाटील आमदारवर संतापले; भाजपवरही जोरदार हल्लाबोल