मुंबई : एकीकडे कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत जीव धोक्यात घालून पोलीस फ्रण्ट लाईनवर लढत आहेत. मात्र दुसरीकडे काही पोलिसांमुळे पोलीस दलाची मान शरमेने झुकत आहे. मुंबईतील अंधेरी एमआयडीसी परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या दरोड्याप्रकरणी एका पोलीस शिपायाला अटक करण्यात आली आहे. संतोष राठोड असं पोलिसाचं नाव असून कोर्टाने त्याला 6 मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या चोरीमध्ये मदत केल्याचा आरोप या पोलीस शिपायावर आहे.


काय आहे प्रकरण?

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात सर्वत्र लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनचा फायदा घेत अंधेरीच्या एमआयडीसीमधील नीरज इंडस्ट्री या गोल्ड मेकिंग कंपनीतून चोरट्यांनी 7 कोटी 9 लाख रुपयांचा ऐवज लुटला होता. हा प्रकार उघडकीस आल्यावर एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला. तांत्रिक बाबींच्या आणि गुप्त माहितीच्या आधारे अत्यंत क्लिष्ट अशा गुन्ह्याचा तपास करत चोरांच्या मुसक्या आवळल्या.

खरंतर चोरांनी 6 एप्रिल रोजी या कंपनीत घुसून सात कोटींपेक्षा किमतीचा ऐवज पळवला होता. कंपनीच्या सुरक्षा रक्षकाच्या मदतीने आरोपींनी इमारतीत प्रवेश केला. गच्चीवर जाऊन कंपनीचा छताचा सिमेंटचा पत्रा तोडून आत घुसले. लोखंडी तिजोरी ग्राईंडर कटरने कापून आतील सोन्याचे हिरेजडीत दागिने, तसंच हिरे आणि इतर दागिने बनवण्याकरता आवश्यक असलेले सोनं असा एकूण 7 कोटी 9 लाख 48 हजार 992 रुपयांचा ऐवज चोरला. कंपनी मालकाला चोरी झाल्याची माहिती 22 एप्रिल रोजी समजली आणि त्याने याची तक्रार एमआयडीसी पोलिसांत केली.

पोलिसांनी तातडीने तीन पथकं तयार करुन वसई, गोरेगाव, कुर्ला, पवई, अंधेरी एमआयडीसी परिसरात आरोपींचा शोध घेतला. कंपनीतील सीसीटीव्हीत संबंधित घटना कैद झाली होती. कंपनी मालकाच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांनी या सीसीटीव्ही फूटेज आणि इतर माहितीच्या आधारे मुख्य आरोपी विपुल चांबरियासह सात चोरांना अटक केली.

या प्रकरणाचा अधिक तपास केला असता, पोलिसांनी मागील दोन दिवसात आणखी दोघांना अटक केली, ज्यात ओशिवारा पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या चोरीमध्ये चोरट्यांना मदत केल्याचा आरोप संतोष राठोडवर आहे. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केल्यानंतर 6 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत सहा कोटी 17 लाखांचा ऐवज जप्त केला आहे

              


आरोपींची नावं

- विपुल आनंदा चांबरिया (वय 35 वर्षे)

- दिमण छोटलाल चौहान (वय, 32 वर्षे)

- मुन्नाप्रसाद हिरालाल खैरवार (वय 49 वर्षे)

- लक्ष्मण नरसप्पा दंडू उर्फ मच्छी (वय 35 वर्षे)

- शंकर कुमार येशू (वय 42 वर्षे)

- राजेश शैलु मारपक्का (वय 29 वर्षे)

- विकास तुळशीराम चनवादी (वय, 24 वर्षे)

- इरफान लतीफ मुलांनी

- संतोष राठोड, पोलीस शिपाई

पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त अंकित गोयल, अंधेरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिनेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांनी पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीपक सुर्वे, पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक देवीदास मुपडे,  पोलीस उपनिरीक्षक विजय आचरेकर आणि गणेश मोहिते आणि सहका-यांच्या मदतीने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.