मुंबई : मुंबईत सोन्या-चांदीचा व्यापार करणाऱ्या चार बड्या कंपन्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं झवेरी बाजार परिसरात ही कारवाई केली. बुलियन ट्रेडर्सशी निगडीत या चारही कंपन्या आहेत.


या चारही कंपन्यांमध्ये नोटाबंदीनंतर 69 कोटी रुपये जमा झाले होते. मात्र हे 69 कोटी रुपये बोगस कंपन्यांच्या माध्यमातून आल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

अद्याप या कंपन्या आणि त्यांच्या मालकांची नावं समजू शकलेली नाहीत. झवेरी बाजारातील छापेमारी सुरु असून ईडी अधिक तपास करत आहे.

खोट्या कंपन्या दाखवत खोट्या अकाऊंटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खोटे ट्रान्झॅक्शन दाखवत जमा केलेली 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम ईडीकडून गोठवण्यात आली आहे. तसंच ही रक्कम कोणत्या बँकेतून, कोणत्या एजंटमार्फत ट्रान्सफर करण्यात आली याचाही शोध सुरु आहे.