ED Summons to Shivsena MP Sanjay Raut : दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांना आलेल्या ईडी समन्सनंतर आता ते आज (शुक्रवारी) ईडी चौकशीसाठी (ED Inquiry) जाण्याची शक्यता आहे. काल (शुक्रवारी) संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, "बहुदा शुक्रवारी दुपारनंतर मी ईडीसमोर हजर होणार आहे. मी माझी भूमिका स्पष्ट करेल. मला पक्षाच्या कामांपासून रोखण्यासाठी, महाराष्ट्राच्या कामापासून रोखण्यासाठी हे सर्व दबाव सुरु आहेत. या दबावांना बळी पडून आमचे काही लोक पळून गेले असले, तरी मी आजच ईडीसमोर हजर राहीन, कोणत्याही प्रकारची कारवाई झाली तरी मी त्याला सामोरं जाईल." , असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आज संजय राऊत ईडीसमोर हजर होणार आहेत.
संजय राऊत यांनी ट्वीट केलंय की, "मी आज दुपारी 12 वाजता ईडीसमोर हजर होणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणं हे माझे कर्तव्य आहे. मी शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये, असं आवाहन करतो."
राज्यातील राजकीय वातावरण गरम झाले असताना दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय नेत्यांची चौकशी सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीनं 28 जून रोजी चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. परंतु, त्यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. अशातच, संजय राऊत यांना अंमलबाजवणी संचालनालय अर्थात ईडीकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. ईडीनं मागितलेली सर्व कागदपत्रं सादर करण्यासाठी संजय राऊत यांनी 14 दिवसांची मुदतवाढ मागितली होती. ईडीनं ही विनंती स्विकारत संजय राऊतांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी 14 दिवसांची मुदतवाढ दिली होती. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीनं संजय राऊत यांना हे समन्स बजावलं होतं.
काय आहे पत्राचाळ घोटाळा?
पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. नेमका काय आहे हा घोटाळा, हे जाणून घेऊया. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.
दरम्यान, ईडीकडून मागील काही दिवसांपासून भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांची ईडी चौकशी सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशी करण्यात आली. राहुल गांधी यांची पाच दिवस 50 तास ईडीनं चौकशी केली. तर, याच प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना समन्स बजावण्यात आलं आहे. सोनिया यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ईडीकडून सोनिया यांच पुढील महिन्यात चौकशी होणार आहे. त्याशिवाय, मागील आठवड्यात शिवसेना नेते अनिल परब यांचीदेखील चार दिवस ईडीनं चौकशी केली. दापोली रिसॉर्ट प्रकरणी ही चौकशी झाली होती.