मुंबई : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी चौकशी करत असलेल्या ईडीने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या विवा ग्रुपमध्ये तब्बल नऊ तास चौकशी केली होती. यानंतर हितेंद्र ठाकूर यांचे चुलत बंधु दीपक ठाकूर यांचा मोठा मुलगा मॉंटी उर्फ मेहुल ठाकूर आणि त्यांच्या कंपनीचे कन्सल्टंट मदन गोपाल चतुर्वेदी यांना ताब्यात घेतले होते. ईडीने त्यांना मुंबई येथील कार्यालयात आणले होते. चौकशीअंती रात्री उशिरा मेहुल आणि चतुर्वेदी या दोघांना ईडीने अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर केले जाईल आणि त्यानंतर पुढील तपास ईडी करणार आहे.


अंमलबजावणी संचालयनालयाने शुक्रवारी (22 जानेवारी) पीएमसी बँक घोटाळ्यासंदर्भात बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालय आणि त्यांची कंपनी विवा ग्रुपच्या वसई-विरार तसंच पालघरमधील ठिकाणांवर छापे मारले. मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीने हे छापे आणि तपास एचडीआयएलकडून विवा ग्रुपला पाठवलेल्या रक्कमेबाबत केली आहे.


ईडीने केलेल्या कारवाईबाबात आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं की, सकाळी साडेनऊ वाजता सात मोठ्या गाड्यांमध्ये ईडीचे 35 ते 40 लोक आमच्या विरारमधील कार्यालयात आले होते. आम्ही तपासात ईडीला संपूर्ण मदत करत आहोत. आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही. सर्व व्यवहार चेकद्वारे झाले आहेत. ईडी कशाबद्दल तपास करत आहे याची मला कल्पना नाही. पण ईडी तपास करत आहे म्हटल्यावर मी पण आता मी पण बडा असामी झालो आहे. कारण ईडी तपासामुळे आता मी देखील मीडियामध्ये दिसणार. वृत्तपत्रांमध्ये माझंही नाव येणार. या निमित्ताने ईडीमुळे मला मोठं बनणण्याची संधी मिळाली आहे. राजकीय द्वेषाबाबत मी एवढंच बोलेन की, वेट अँड वॉच. मी ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासही तयार आहे.


पीएमसी बँकेच्या 6670 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात एचीडीआयएल मुख्य आरोपी आहे. एचडीआयएलशी संबंधित कंपनी सांभाळणाऱ्या प्रवीण राऊत यांना विवा ग्रुपला निधी वळवण्याच्या प्रकरणात संशयित म्हणून पाहिलं जात आहे. ईडीने प्रीवेंशन आफ मनीलाँड्रिंग कायद्याअंतर्गत प्रवीण राऊत यांची आतापर्यंत 72 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. प्रवीण राऊत हे एचडीआयएलची सब्सिडरी असलेली गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रायवेट लिमिटेडचे संचालक होते. दरम्यान पीएमसी बँक प्रकरणात ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी केली होती.