मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केलीय का असा प्रश्न संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे उपस्थित होत आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात समन्स बजावल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अनिल परब यांना या प्रकरणी मंगळवाली ईडी चौकशीला हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. Chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू. जय महाराष्ट्र."
पुढचा नंबर जितेंद्र आव्हाडांचा- किरीट सोमय्या
मी गेल्या चार महिन्यांपासून याबद्दल बोलत आहे. त्यामुळे रत्नागिरीची मुद्दा पुढे करुन घोटाळेबाजांना पाठिशी घालू नका, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना उद्देशून म्हटलं. अनिल देशमुख, आता अनिल परब आणि पुढचा नंबर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांचा असेल, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. अनिल परब यांनी किती माया गोळा हे संजय राऊतांनी अनिल परब यांना विचारावे. आरटीओ ट्रान्सफरपासून इतर गोष्टीतून अनेक पैसे वापरले असं अनिल परब यांनी कबूल केलं असा आरोप किरीट सोमया यांनी केला आहे.