मुंबई : यंदा दिवाळीच्या आधीच निवडणुकीच्या निकालाचे, फटाके फुटणार आहेत. मात्र, निवडणुकीमुळे दिवाळीतला साहित्यिक फराळ म्हणजे दिवाळी अंक महागला आहे आणि त्याची आवकही कमी झाली आहे.

यंदा आर्थिक मंदी आणि दिवाळीच्या तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची झळ दिवाळी अंकांना बसली आहे. विविध राजकीय पक्ष, बँका आणि व्यावसायिकांनी जाहिरात देण्यास हात आखडता घेतल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत जाहिरातींचे प्रमाण निम्म्याने घटलं आहे.

सध्या बाजारात जेमतेम 50 दिवाळी अंक दाखल झाले असून पुढील आठवड्या अखेरपर्यंत त्यांची मोठी उलाढाल होईल अशी अपेक्षा आहे. राज्यभरातून दरवर्षी किमान साडेतीनशेच्या आसपास दिवाळी अंक प्रकाशित होतात. दिवाळी अंकांना मोठ्या प्रमाणावर बांधकाम व्यावसायिक, गृहोपयोगी वस्तू, ज्वेलर्स, सहकारी बँका यांच्याकडून जाहिराती दिल्या जातात. तीन वर्षांपूर्वीचे निश्चलनीकरण, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आणि महारेरा कायद्यामुळे बांधकाम व्यवसायात आलेल्या मंदीचाही फटका दिवाळी अंकांना बसला आहे.

दर वर्षी राजकीय नेते, पक्षांकडूनही मोठ्या प्रमाणावर जाहिराती मिळतात. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीच्या खर्चामुळे जाहिराती येण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे प्रकाशकांचे म्हणणे आहे. याशिवाय सरकारही दिवाळी अंकांना जाहिराती देते. परंतु, निवडणुकीमुळे सरकारकडून ऐनवेळी जाहिरात देण्यास नकार मिळाल्याने प्रकाशकांची मोठी पंचाईत झाली आहे.

याशिवाय, महाराष्ट्रातील विशेषत: कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थितीचा मोठा फटका यंदाच्या दिवाळी अंकांना बसला आहे.