Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी पावसानं हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. तसेच पुणे, नाशिक, अहमदनगर या भागातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यात पावासाचा इशारा दिला आहे. आजही संपूर्ण राज्यात हवामान विभागानं पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.


हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि परिसरात रात्री जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला. वाहतूक संथ गतीनं सुरु होती. पनवेलमधील वडघर कोळीवाडा येथील विसर्जन घाटावर गणेशभक्तांच्या सोयीसाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जनावेळी जोराचा पाऊस सुरु होती. यावेळी जनरेटरची एक वायर तुटून एका तरुणाच्या अंगावर पडली. यावेळी त्याला शॉक लागला. त्याला पाहून कुटुंबीयांनी मदत करण्यासाठी त्याला स्पर्श केला. या वेळी कुटुंबीयांनाही विजेचा धक्का बसल्याची घटना घडली आहे.


यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?


यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.


नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस


नाशिक (Nashik) शहरासह परिसरात अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi) दिवशी पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. सायंकाळी पावणे सहा वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस रात्री पावणे बारा वाजेपर्यत कोसळत होता. जवळपास पावणे सहा ते रात्री साडे अकरा पर्यंत  86.9  मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी होते, तर उड्डाणपूलही पाण्याचे वाहत होते. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पावसाने हजेरी लावल्याचे चित्र होते. दरम्यान, हवामान खात्याकडून नाशिकला गुरुवारपासून शनिवारपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 


जायकवाडी धरणातून 56 हजार क्यूसेकने विसर्ग सुरु


नाशिक जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं पैठण येथील जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात सुद्धा पाण्याची आवक वाढली आहे. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवून एकूण 56 हजार 592 क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग पाहता गणेश भक्तांनी नदी पात्रात विसर्जनासाठी जाऊ नयेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर नदी काठच्या गावात पोलिसांकडून गस्त सुद्धा घातली जात आहे. तर गावातील पोलीस पाटील यांना सुद्धा नदी काठावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर


एकीकडे राज्यात सर्वत्र गणपती बाप्पाचं विसर्जन होत असतानाच, दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांनाही बाप्पा पावला आहे. कारण शिंदे सरकारने राज्यातील सुमारे 19 लाख शेतकऱ्यांना 3 हजार 501 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. पुढील दोन दिवसांत नुकसानभरपाईचे वाटप केले जाणार असल्याची माहिती, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: