मुंबई : अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण आणल्याचे दावे केले जात असले तरी अजूनही मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची खरेदी आणि विक्री होत असल्याचे समोर येत आहे. कालच मध्य रेल्वेच्या, रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने दोन कोटींच्या अंमली पदार्थांसह एका नायजेरियन माणसाला रंगेहात पकडले. त्याच्याकडे दोन किलो 300 ग्रॅम इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ होते. या गुन्हेगारास पकडल्याने अंमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


काल दिल्लीहुन अर्नाकुलमला जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसमध्ये अज्ञात प्रवाशाने अलार्म चैन खेचल्याने ती गाडी तळोजा स्थानकात थांबवण्यात आली. यावेळी स्टेशनवरील आरपीएफ हेड कॉन्स्टेबल के एन शेलार आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान शिवाजी पवार यांनी तपासणी केली असता एका नायजेरियन माणसाने ही चैन खेचल्याचे समोर आले. हा माणूस ट्रेन मधून उतरून पळून जात होता. त्यामुळे संशय आल्याने त्याला या दोन्ही जवानांनी ताब्यात घेतले. मात्र, चैन का खेचली? या प्रश्नाचे त्याच्याकडे उत्तर नसल्याने त्याला ताब्यात घेऊन दिवा येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या मुख्य कार्यालयात आणले गेले. या ठिकाणी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन किलो पेक्षा जास्त पावडर सदृश्य गोष्ट असलेले पॅकेट आढळले. त्यामुळे आरपीएफ द्वारे मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांना बोलावले गेले. एनसीबीच्या तज्ञ पथकाने या पदार्थाची तपासणी केली असता ते 'अ‍ॅम्फॅटामाइन्स' नावाचे मादक द्रव्य असल्याचे निष्पन्न झाले. या पाकिटाचे वजन दोन किलो 300 ग्रॅम इतके होते. तर या मादक द्रव्याची बाजारातील किंमत दोन कोटींच्या घरात असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.


मुंबईत 60 लाखांचा हिरोइन जप्त; गुन्हे शाखेची कारवाई


पळून जात असताना आरोपी ताब्यात
या नायजेरियन माणसाचे नाव सनी ओचा आयके असून तो 41 वर्षांचा आहे. त्याच्याकडे नवी दिल्ली ते पनवेल हे तृतीय वातानुकूलित डब्याचे तिकीट होते. मात्र, पनवेल यायच्या आधीच तो पळून जात होता. या माणसाकडे ड्रग्स असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याच्यावर नारकोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्ससेस म्हणजेच एनडीपीएस या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. सापडलेले अंमली पदार्थ आरपीएफ ने एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केले आहे. आरपीएफच्या के एन शेलार आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या शिवाजी पवार या दोन कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या एका कारवाईमुळे मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.


Nashik Crime | नाशिकमध्ये कोरोना सर्वेक्षणासाठी आल्याचं भासवत भामट्यांनी दागिने लुटले