मुंबईत घाटकोपरमध्ये 2 कोटींचं ड्रग्ज जप्त
एबीपी माझा वेब टीम | 10 Jan 2017 08:35 PM (IST)
मुंबई : मुंबईत घाटकोपरमध्ये 2 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. मेफेड्रोन नावाचं 10 किलो ड्रग्ज जप्त करत एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. होंडा सिव्हीक कारमधून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती अँटी नार्कोटिक्स विभागाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून छेडा नगर जंक्शनजवळ ही कारवाई करण्यात आली. 10 किलो 200 ग्रॅम मेफेड्रोनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत जवळपास 2 कोटी आहे. मेफेड्रोनसोबतच एमडी नावाचं ड्रग्जही जप्त करण्यात आलं. अँटि नार्कोटिक्सनं धडक कारवाई करत ड्रग्जसह कारही ताब्यात घेतली आहे. या कारवाईत 2 कोटी 11 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये बांद्रा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु आहे. स्वत:ला व्यावसायिक सांगणाऱ्या या व्यक्तीकडे एवढं ड्रग्ज कुठून आलं आणि तो कुणाला हे ड्रग्ज देणार होता याचा तपास सुरु आहे.